कल्याण : कल्याण मधील गौरीपाडा येथील सीटी पार्क २९ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना निशुल्क ठेवण्याचा निर्णय आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घेतला आहे. १ मार्चपासून पालिकेने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क आकारून नागरिकांना सीटी पार्कमध्ये प्रवेश दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सीटी पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभर सीटी पार्क मध्ये नागरिकांना प्रवेश निशुल्क ठेवण्यात आला होता. ही मुदत आता फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कल्याण परिसरातील नागरिक अधिक संख्येने पार्क भेटी देत आहेत.

हेही वाचा…ठाणे : रेल्वेगाडीत महिलेचे छायाचित्र काढून विनयभंग

नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून आयुक्तांनी ही मुदतवाढ दिली आहे. येत्या १ मार्चपासून प्रशासन निश्चित करील त्या प्रवेश शुल्काप्रमाणे सीटी पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून योग्य ते शुल्क आकारले जाईल, असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली परिसरात प्रथमच मनोरंजनाचे नवीन ठिकाण सीटी पार्कच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे.