आधुनिक काळात संदेशवहनाची माध्यमे बदलली आहेत. मात्र, फार पूर्वीपासून पत्रव्यवहारासाठी कबुतर या पक्ष्याचा उपयोग केला जायचा हे सर्वज्ञात आहे. पूर्वी संदेशवहनासाठी वापरण्यात येणारे हे कबुतर आज जगभरात मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. आपल्या खास वैशिष्टय़ांमुळे कबुतरांनी पक्षिप्रेमींच्या मनावर छाप टाकली आहे. दोन हजार वर्षांपासून सतत कबुतरांचे ब्रीडिंग मोठय़ा प्रमाणात होत असून या पहिल्या शतकात या कबुतरांचा इतिहास उलगडतो. रोमन इतिहासकार प्लिनी याने कबुतरांचे संदर्भ जमा करायला सुरुवात केली. त्या काळापासून कबुतरांचे ब्रीडिंग दिवसेंदिवस वाढत जात आहे. भारतात मुघल सम्राट आपल्यासोबत कबुतर पक्षी घेऊन आले. तेव्हापासून भारतात कबुतरांचा प्रसार झाला. जवळपास साठ वर्षे भारतात ओरिसा पोलीस युनिट संदेशवहनासाठी कबुतरांचा उपयोग करत होते. वेगवेगळ्या प्रजातींचे ८०० कबुतर त्या वेळी ओरिसा पोलीस युनिटमध्ये पालन केलेले होते. २००६ मध्ये ओरिसा पोलीस युनिटची ही संदेशवहनाची प्रथा बंद पडली. पहिले ऑलिम्पिक खेळ ज्या वेळी सुरू झाले तेव्हा अॅथलेटिक्स खेळाडू आपल्या गावातून काही कबुतर घेऊन यायचे. खेळाडू खेळ जिंकल्यावर हा संदेश कबुतरांसोबत गावात पाठवला जायचा. तेव्हापासून आजपर्यंत ऑलिम्पिक खेळ सुरू होण्यापूर्वी कबुतर सोडले जाण्याची प्रथा कायम आहे.
या कबुतर पक्ष्यांचे साधारण तीनशे ते साडेतीनशे प्रकार आहेत. यात आठ प्रकारचे काही वैशिष्टय़ असणारे कबुतरांचे समूह आढळतात. कबुतरांच्या विविध स्पर्धा, शोज आणि काही पक्षिप्रेमींनी घरी पालनामुळे कबुतरांना आपलेसे केले आहे.
* युटिलिटी समूह : पूर्वी या समूहातील कबुतर मांस खाण्यासाठी वापरले जायचे.
* फ्लाइंग समूह : या समूहातील कबुतरांचा ठरावीक अंतर कापण्याचा वेळ मोजला जातो. त्यासाठी कबुतरांच्या स्पर्धा भरवल्या जातात. कमीत कमी वेळात ठरावीक अंतर सर्वात आधी पार करणारे कबुतर विजयी ठरतात. या समूहात हाय फ्लायर कबुतरांच्या प्रकारात ज्या ठिकाणी यांचे पालन केले जाते तेथून नजरेला दिसणाऱ्या अंतरापर्यंत आकाशात दीर्घ काळ राहणाऱ्या कबुतराला विजयी ठरवले जाते.
* एशियन फेदर : वेगवेगळे पिसारे या समूहातील पक्ष्यांना असतात. काही प्रमाणात सामान्य कबुतरांपेक्षा या समूहातील पक्ष्यांचा आवाज वेगळा असतो. हसण्याचा आवाज हे कबुतर काढू शकतात.
* होमर : शर्यतीसाठी हे कबुतर वापरले जातात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हे कबुतर जलद संदेशवहनासाठी वापरले गेले. ज्या ठिकाणी कबुतर वास्तव्यास असतात ते ठिकाण कबुतर कधीच विसरत नाहीत. कितीही लांब पल्ला कमीत कमी वेळात अचूकपणे गाठण्याची किमया त्यांच्याजवळ आहे.
* एक्झिबिशन : शोभेसाठी या कबुतरांचे पालन करतात.
* कलर पिजेन : रंगीत कबुतर अतिशय लोकप्रिय आहेत.
* पाऊटर : या समूहातील कबुतरांना छातीत हवा भरण्याची सवय असते. छातीमध्ये हवा भरून पुन्हा सोडणे ही त्यांची सवय आहे.
* फ्रिल्स : हे कबुतरसुद्धा शोभिवंत प्रकारात मोडतात. दिसायला रुबाबदार असणाऱ्या या कबुतरांची पिसे उलटी असतात. डोक्यावर तुरा असतो. जगभरात या कबुतरांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.
भारतात रॉक पिजेन मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. ३२ ते ३७ सेंमीपर्यंत उंची आणि ६४ ते ७२ सेंमीपर्यंत हे कबुतर आपले पंख पसरवतात. मादी दोन अंडी देते. नर आणि मादी दोघेही अंडी उबवण्याचे काम करतात. कबुतरांची जोडी एकदा घट्ट झाली तर कायम नर आणि मादी एकत्र राहतात. हे कबुतर ६०० ते ७०० मैल एका वेळी अंतर कापू शकतात. तसेच पंचावन्न दिवसात साऊथ आफ्रिका ते इंग्लंड असे ७००० मैल अंतर प्रवास करून जागतिक विक्रम कबुतरांनी केला आहे, असे जाणकार दिनेश वैद्य यांनी सांगितले.
भारतीय बाजारात कबुतरांचे फॅन्सी आणि रेसिंग हे दोनच प्रकार ओळखले जातात. फॅन्सी या प्रकारात फँटेल, अमेरिकन फँटेल, शिराजी, बोखारा, मोगपाय, पाऊटर, जॅकबाइन, रंट, मोदेना, किंग अशा नावांनी काही कबुतर ओळखतात. रेसिंग या कबुतरांच्या प्रकारात पिपलर, कलसिरा, कलतुमा, बेदाग, हरे, सुरखा, कलकोचा असे काही नावांचे कबुतर आढळतात. मुंबईतील रुपर्ट ब्रेगान्झा या गृहस्थाने ऑस्ट्रेलियात जाऊन या कबुतरांचे वेगवेगळे ब्रीडिंग केले आणि तिथला विक्रम मोडला.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2016 रोजी प्रकाशित
पेट टॉक : संदेशवाहक चतुर कबुतर
संदेशवहनासाठी वापरण्यात येणारे हे कबुतर आज जगभरात मोठय़ा प्रमाणात पाळले जातात.
Written by किन्नरी जाधव

First published on: 29-03-2016 at 03:48 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clever messenger pigeon