डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील नागरीकरण होत असलेल्या भागात अधिकाधिक आरोग्य सुविधा देऊन या भागातील रुग्णांची गैरसोय दूर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. येथे कर्करोग रुग्णालय आणि सूतिकागृहाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे डोंबिवलीतील टिळक रस्त्यावर २०० खाटांचे सूतिकागृह आणि कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे.
हेही वाचा >>> भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका
गेल्या १० वर्षांपासून रखडलेला अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला आहे. यासह मासळी बाजार, शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्याकीय सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थितीत होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कळवा शहरांमध्ये अद्यायावत वैद्याकीय सुविधा देऊन गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची खर्चाची तरतूद दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.