‘टीएमटी’ बसगाडय़ांना टोलचा अटकाव

शहरातून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागास सेवा देणाऱ्या ठाणे महानगरपालिका परिवहनच्या बसगाडय़ा परिवहनकडून टोल दिला जात

शहरातून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागास सेवा देणाऱ्या ठाणे महानगरपालिका परिवहनच्या बसगाडय़ा परिवहनकडून टोल दिला जात नसल्याने सोमवारी सकाळी बाळकुम येथील टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी रोखल्या. या बसगाडय़ा परत ठाण्याकडे पाठवण्यात आल्या.
या प्रकारामुळे या मार्गावरून धावणाऱ्या परिवहनच्या सुमारे १२५ हून अधिक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. मात्र हा प्रकार महापौर संजय मोरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी टोल प्रशासनाशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन बससेवा पूर्ववत करण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले.
बाळकुम टोलनाक्यावर प्रसाद कन्स्ट्रक्शनच्या वतीने टोलवसुली करण्यात येत असून बसेससाठी ९० रुपयांचा टोल आकारला जातो. यापूर्वीच्या टोल कंपनीकडून परिवहनला टोलमाफी मिळत होती. त्यामुळे या नव्या कंपनीकडूनही टोलमाफी मिळावी असा परिवहनचा आग्रह आहे.
परिवहन उपक्रम हा सार्वजनिक वाहतूक सेवा देत असल्याने त्यांना या टोलमधून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती दरवर्षी राज्य शासनाकडे करण्यात येते व त्यातून टोल वाचवला जातो. मात्र तरीही या टोल कंपनीकडून बस गाडय़ा अडविल्या गेल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.
दिवसभरात मुलुंड ते नारपोली या मार्गावर ६ ते ७ बसेसच्या ४५ फेऱ्या होत असतात. तर चेंदणी कोळीवाडा ते नारपोली पोलीस ठाणे मार्गावर १० बसेसच्या ८० फेऱ्या होतात. या फेऱ्या रद्द केल्याने भिवंडी ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकाराची माहिती नागरिकांनी महापौरांना दिल्यानंतर त्यांनी परिवहन व्यवस्थापक व टोल व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून यामध्ये सन्मानीय तोडगा लवकर काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन ही बससेवा सुरू करण्याचे आदेश   उपक्रमाला दिले. सायंकाळनंतर ही बससेवा पूर्ववत सुरू झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Commuters stranded as tmt buses stopped at toll naka

ताज्या बातम्या