सवलतीच्या सभासदत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांत स्पर्धा

ठाणे : शहराच्या मध्यभागी असलेल्या ठाणे क्लबमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत असताना ठाण्यातील नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांना मात्र, सवलतीच्या दरात क्लबचे सदस्यत्व मिळते. याबाबत नेहमीच ओरड होत असली तरी, सध्या सवलतीचे सभासदत्व कुणी पटकवायचे, यावरून पालिका अधिकाऱ्यांमध्येच रस्सीखेच सुरू आहे. ठरावीक अधिकाऱ्यांनाच नेहमी हे पास मिळत असल्यावरून नाराजी असल्याने यंदा दोन वर्षांपासून सवलत न मिळालेल्या अधिकाऱ्यांना सवलतीचे सभासदत्व देण्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पैशांतून रहेजा गृहसंकुलासमोरील जागेत ठाणे क्लब उभारण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने मेसर्स गणेशानंद डेव्हलपर्स या ठेकेदाराशी करार करून हा क्लब चालविण्यासाठी दिला आहे. सर्व सुविधायुक्त अशा या क्लबचे सभासदत्व मिळवण्यासाठी ठाणेकर नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागतात. मात्र, हा क्लब महापालिकेने उभारला असल्याने ठेकेदारासोबत केलेल्या करारानुसार महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी सवलत देण्यात येते. यंदाही गणेश डेव्हलपर्सतर्फे पालिकेला १०० सभासदांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये या क्लबचे सभासदत्व उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी ७५ वार्षिक पास नगरसेवकांसाठी तर २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. उत्तमोत्तम सेवा अतिशय कमी शुल्कात अधिकाऱ्यांना मिळत असल्याने तेच तेच अधिकारी याचा लाभ घेत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत या सुविधेचा लाभ न घेतलेल्या अधिकाऱ्यांना यंदा प्राधान्य देणाचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या क्लबमध्ये नगरसेवक, अधिकाऱ्यांना सवलत दिली जात असताना सर्वसामान्यांना मात्र पाच वर्षांसाठी १ लाख ७५ हजार म्हणजेच ३५००० रुपये वार्षिक शुल्क आकारले जात आहे. नगरसेवक आणि पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वर्षांला ४ हजार ४५० रुपये एवढे अत्यल्प शुल्क आकारण्यात येते.  विशेष म्हणजे, सदस्यत्व पाच वर्षांसाठीच घेणे अनिवार्य करण्यात आल्याने वर्षभरासाठी सदस्यत्व घेण्याचा मार्गही  बंद करण्यात आला आहे.