डोंबिवली पूर्व भागातील वर्दळीच्या पाटकर मार्गावरील कैलास लस्सीसमोरील रस्त्यावर महापालिका अभियंत्यांनी पेव्हर ब्लॉक बसविले. सतत वर्दळ असलेल्या या रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकचे काम सुरुवातीपासून निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पितळ उघडे पडू नये यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पेव्हर ब्लॉकची बांधणी घट्ट करण्यासाठी त्यावर चक्क डांबर ओतण्याचा विचित्र प्रयोग सुरू केल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, चिमणीगल्ली, फडके रस्ता, रॉथ रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकरवाडी हा परिसर बाराही महिने पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. या भागातून रिक्षा, दुचाकांची सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्याचा भाग सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार असल्याने पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, तसे न करता महापालिका अभियंत्यांनी डोंबिवली पूर्व भागातील सर्व चौक, रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचा उद्योग सुरू केला आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढविली आहे. पेव्हर ब्लॉकचे रस्ते निकृष्ट निघाल्याच्या तक्रारी वाढल्याने पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील कैलास लस्सी दुकानासमोर पेव्हर ब्लॉकवर डांबर ओतून ते बंदिस्त करण्याचा ‘अभिनव’ प्रयोग पालिका अभियंत्यांनी यशस्वी केला आहे. पेव्हर ब्लॉकवर डांबर ओतून ते घट्ट करण्याचा प्रयत्न करणे, असे शिक्षण पालिका अभियंत्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतले आहे, याची माहिती आपण सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून घेणार आहोत, असे भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितले. पेव्हर ब्लॉकवर डांबर ओतण्याच्या कामासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. करदात्या जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असे या नगरसेवकाने सांगितले. या पेव्हर ब्लॉकमध्ये फटी असल्याने तेथे कचरा अडकून बसतो. सफाई करताना तो कचरा बाहेर येत नाही. पावसाळ्यात हा कचरा साचून राहिला तर घाण होईल. त्यामुळे पेव्हर ब्लॉकमधील फटी बुजविण्यासाठी व गुळगुळीतपणासाठी डांबर टाकण्यात आले आहे. वरिष्ठांनी तसे आदेश दिले, असे पालिकेतील विश्वसनीय सूत्राने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaints against pevar block poor work
First published on: 18-05-2016 at 05:03 IST