सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणाचा निर्णय

वसई : सूर्या पाणी प्रकल्पाला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीजवाहक तारा या संरक्षित केल्या जाणार आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सूर्या पाणी प्रकल्पाचा पाणीपुरवठा खंडित होत आहे. यासाठी वीजवाहक तारा भूमिगत करण्याऐवजी त्या प्लास्टिकच्या आवरणाने संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वसई विरार शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर, ऊसगाव २०,  पेल्हार १० असा २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २०० दशलक्ष लिटर्स पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते. पालघरजवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि धुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते. मासवण उदंचन केंद्रात ३०० हॉर्स पॉवरचे ७ पंप आहेत तर धुकटण केंद्रात ८०० हॉर्स पॉवरचे ३ आणि ६०० हॉर्स पॉवरचे ४ असे एकूण १४ पंप आहेत. दोन्ही ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होतो. उदचंन केंद्रात पाणी आणणे, ते शुद्धीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठय़ा क्षमतेची वीज लागते. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा देखील खंडित होतो. एक मिनिट जरी वीज खंडित झाली की सर्व पंप बंद पडतात. एक पंप पुन्हा सुरू होण्यासाठी १५ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे पाणीपुरवठा बराच काळ खंडित होतो आणि पुढील पाणीपुरवठा देखील अनियमित दाबाने होत असतो.

वसई शहराला आधीच पाणीसाठा कमी असून त्यात महावितरणाकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दोन महिन्यात २४ पेक्षा अधिक वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे महावितरणाने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालिकेतर्फे वारंवार महावितरणला करण्यात येत होती.

सूर्या प्रकल्पाला वीजपुरवठा करणाऱ्या साडेचार किलोमीटर लांबीच्या या वीजवाहक तारा आहेत. त्या जंगलातून येतात. त्यामुळे विविध नैसर्गिक आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत राहतो. वीजपुरवठा खंडित न होता तो सुरळीत राहण्यासाठी या वीज वाहक तारा भूमिगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र ते सध्या करणे शक्य नसल्याने महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी वीजवाहक तारा जर संरक्षित केल्या तर तांत्रिक त्रुटीने तो वीजपुरवठा खंडित होणार नाही, असा पर्याय समोर आला. यामुळे पाणी प्रकल्पाच्या सर्व वीजवाहक तारा या प्लास्टिकच्या आच्छादनाने (कोर कंडक्टर) संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे तारांचे घर्षण होणार नाही आणि पर्यायाने ट्रिपिंग होणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.