ठाणे : ऑपरेशन सिंदूर या मोहीमेचे संपूर्ण देशात स्वागत केले जात आहे. लष्कराच्या कारवाईबद्दल सर्वत्र जल्लोष केला जात आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी उभारण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या तसेच अंतर्गत भागात हे फलक लावल्याने हे फलक ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. ‘भारतीय सैन्यदलाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन’ असे या फलकावर मजकूर आहे. फलकांखाली एकनाथ शिंदे आणि शिवसेना परिवार असेही लिहीण्यात आले आहे.
काश्मीर येथेल पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला धडा शिकविण्याबरोबरच अतिरेक्यांचा खात्मा करण्याची मागणी केली जात होती. बुधवारी माॅक ड्रील घेण्यात येणार होती. परंतु त्यापूर्वीच लष्कराने अचानक पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळावर हवाई हल्ले केले. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूर मोहीमेच्या यशानंतर सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. अनेकांनी समाज माध्यमांवर त्या विषयी प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील टेंभीनाक्यावर शिवसेना शिंदे गटाने जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वज देखील यावेळी जाळण्यात आला. सर्वांनी पेढे वाटून भारताचे आनंद साजरा केला.
बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने ठाण्यातील मुख्य चौकात तसेच अंतर्गत शहरात ठिकठिकाणी लष्कराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे फलक उभारले आहेत. हे फलक ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलकावर ऑपरेशन सिंदूर बाबत लष्कर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा वर्षाव करणारा मजकूर लिहीण्यात आला आहे. फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लष्कराच्या पोषाखातील छायाचित्र दिसत आहे. तसेच फलकावर ‘रक्त आमच शिवरायांचं माती पाकड्यांना चाखऊ, कुंकवाची किंमत काय असते भाड्यांना दाखवू’ असेही फलकावर म्हटले आहे.