वाढीव रक्कम कमी करण्याकरिता व तक्रारीसाठी ग्राहकांच्या विभागीय कार्यालयांबाहेर रांगा

वसई : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीज देयके देण्यात आली आहेत. देण्यात आलेली वीज देयके वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतची तक्रार करण्यासाठी विभागीय कार्यालयांत ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीज देयके पाठविणे आदी कामे बंद करण्यात आली होती त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीज देयके पोहोचली नव्हती. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात शिथिलता मिळाल्यानंतर ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र नाही अशा भागातील वीज ग्राहकांना वीज देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र महावितरणकडून देण्यात येणारी वीज देयके ही अंदाजे आकारण्यात आल्याने वाढीव दिली असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.

बुधवारी नायगाव पूर्वेतील परिसरात वीज देयके कमी करण्यासाठी व त्याबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. जरी महावितरणने सरासरी बिल काढले असले तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. आधीच टाळेबंदीत हाताला काम नाही अशामध्ये वीज देयके कशी भरायची असा प्रश्न उपस्थित केला आहे.

वीज देयके ही एम.ई.आर.सी. यांच्या निर्देशानुसार जानेवारी ते मार्च या महिन्यांचे सरासरी वापराचे युनिट काढून ग्राहकांना देयके दिली आहेत. त्यामुळे देण्यात आलेली वीज देयके ही अचूक असल्याचे महावितरणतर्फेसांगण्यात आले आहे. तसेच ज्यांना वीज  देयके जास्त आल्याचे वाटत असेल त्यांनाही महावितरणच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत वीज देयक कसे दिले आहे याची माहिती दिली जात आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता महावितरणकडून वीज न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर काढून घेण्यात आले नाही तरीही ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले जात असल्याचे अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांनी केले आहे.

ग्राहकांच्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा धोका

वीज देयके कमी करण्यासाठी ग्राहकांनी आता महावितरणच्या विभागीय कार्यालयात फेऱ्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. आधीच वसई विरार शहरात करोना प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे त्यातच आता ग्राहकांना वीज बिल भरमसाट आल्याने कमी करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत असल्याने यामुळे करोना संसर्गाचा प्रसार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टाळेबंदी असल्याने कोणत्याही वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेण्यात आले नसल्याने ग्राहकांना सरासरी वीज देयके काढण्यात आली आहेत. जून महिन्यापासून मीटर घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील.

– मंदार अत्रे, अधीक्षक, अभियंता महावितरण वसई