अंबरनाथ-बदलापूरदरम्यान लोकलमधून प्रवास करताना दगड लागून गाडीतून खाली पडून बळी गेलेल्या दर्शना पवार हिची हत्या चोरीच्या उद्देशानेच झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी रतन मारवाडी याला अटक करण्यात आली आहे. दर्शना रेल्वेतून पडल्यानंतर तिच्याजवळील दागिने आणि मोबाइल चोरून नेताना रतनने तिचे सिमकार्डही चोरले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी त्याला शीळ फाटा येथून ताब्यात घेतले.
नवी मुंबईतील एका आयटी कंपनीत काम करणारी दर्शना पवार ही ९ फेब्रुवारी रोजी रात्री कामावरून घरी परतण्यासाठी लोकलमधून प्रवास करीत होती. त्या वेळी अंबरनाथ ते बदलापूरच्या दरम्यान तिच्यावर दगड भिरकावण्यात आल्याने तोल जाऊन ती खाली पडली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
दरवाजात उभी असताना तोल जाऊन पडल्याने दर्शनाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र तिची पर्स आणि अन्य सामान घटनास्थळापासून काही अंतरावर पडल्याचे आढळल्याने तसेच तिचे दागिने आणि मोबाइल न मिळाल्याने चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा, असा निष्कर्ष तपासातून पुढे आला. दर्शनाच्या आई-वडिलांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. कल्याण रेल्वे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून या तपासाकरिता विशेष पथके तयार केली. दर्शनाच्या मोबाइलच्या सिमकार्डची माहिती घेतली असता त्यावर नाशिकजवळील वणी येथील ठिकाण दाखवण्यात आले. त्यातच या घटनेनंतर असे गुन्हे करणारे तिघे जण बेपत्ता असल्याचेही आढळून आले. तसेच यापैकी एक जण नुकताच वणीला जाऊन आल्याचेही उघड झाले. त्यावरून पोलिसांनी पुढे तपास करून शीळ फाटा येथून रतन मारवाडी (४५) याला अटक केली. दगड मारून दर्शनाला लोकलमधून खाली पाडले व त्यानंतर तिचा मोबाइल व दागिने चोरल्याची कबुली रतनने पोलीस चौकशीत दिली. रतन याच्यावर याआधीही रेल्वेतील चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे करत आहेत.