वसई : यंदाच्या गणेशोत्सव काळात झेंडूच्या फुलांना जरी झळाळी मिळाली असली तरी वसईतील भागातून जाणाऱ्या चाफा, मोगरा, सायली यासह इतर सुगंधित फुलांना करोनामुळे ऐन सणासुदीच्या काळात अपेक्षित दर न मिळाल्याने फटका बसला आहे.
वसईच्या विविध ठिकाणच्या भागात फुलांची लागवड करणारे शेतकरी आहेत. चाफा, मोगरा, सायली, जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, करोनामुळे काही महिन्यांपासून हा फुलविक्री व्यवसायात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. दरवर्षी या फुलांना गणेशोत्सव काळात मोठी मागणी असते. खास करून वसईच्या भागातून जाणाऱ्या सुगंधित फुलांना सणासुदीला चांगला दर मिळतो. यंदा तितका काही अपेक्षित दर मिळालेला नाही. फुलांच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. आधीच चार महिने अडचणीचे गेले आहेत. त्यामुळे आता मिळेल त्या भावात फुलांची विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
सणासुदीला सोनचाफ्याचे दर साधारण ८०० रुपये शेकडय़ापर्यंत जातात परंतु यावर्षी केवळ ३०० ते ४०० शेकडा प्रमाणे विक्री करावी लागत आहे. मोगरा हा दोन हजार रुपये किलोपर्यंत जातो. तोच यंदा १ हजार ते १२०० रुपयापर्यंत राहिला आहे. तर जास्वंदलाही हव्या तशा प्रमाणात दर मिळाला नसल्याचे फुल उत्पादक शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले आहे.
उपनगरी रेल्वे गाडय़ा सुरू न झाल्याने इतर ठिकाणाहून येणारे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे काहींनी स्थानिक बाजारातून फुलांची खरेदी केली आहे.
तुळशीला मागणी
करोनाच्या संकटामुळे इतर फुलांना मोठा फटका बसला असला तरी यावर्षी तुळशीच्या जुडीला चांगली मागणी आहे. शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढय़ात वापर केला जातो. त्यामुळे तुळशीच्या मागणीत वाढ झाली आहे. एक जुडी आकारानुसार साधारण २५ ते ४० रुपयांना विकली जात आहे.