आयुध निर्माणच्या बदललेल्या व्यवस्थापनाकडून अंबरनाथ पालिकेला सूचना

अंबरनाथ : येथील आयुध निर्माणीच्या बदललेल्या व्यवस्थापनाने तेथील सुरू असलेले ४० खाटांचे रुग्णालय हलवण्याच्या सूचना अंबरनाथ नगरपालिकेला केल्याने आता पुन्हा जांभुळ येथील दंत महाविद्यालयात करोना रुग्णालय हलवण्यात येणार आहे. खर्च वाढत असल्याचे कारण देत अंबरनाथ नगरपालिकेने गेल्या महिन्यात करोना रुग्णालय दंत महाविद्यालयातून आयुध निर्माणीत हलवले होते.

रुग्णालयासोबतच आयुध निर्माणीतील लसीकरण केंद्रही आता जांभुळच्या दंत महाविद्यालयात न्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेल्या वर्षात अंबरनाथ नगरपालिकेने बंद असलेल्या दंत महाविद्यालयाच्या इमारतीत रुग्णालय सुरू केले होते. दुसऱ्या लाटेत येथील खाटांची क्षमता ७०० पर्यंत वाढवण्यात आली होती. या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि जीवरक्षक प्रणालीही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयाचा मोठा डोलारा सांभाळणे अंबरनाथ नगरपालिकेला कठीण जात होते.

शहरातील रुग्णांना हक्काचे रुग्णालय असावे म्हणून शहरातीलच आयुध निर्माणीत रुग्णालय उभारण्यासाठी हालचाली सुरू होत्या. आयुध निर्माणीने पालिका प्रशासनाला ४० खाटांचे रुग्णालय उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे शहरातील रुग्णांवर उपचार करणे सोपे झाले होते. मात्र नुकतेच आयुध निर्माणीतील बदललेल्या व्यवस्थापनाने भूमिकेत बदल केला आहे.

लसीकरणाच्या  पत्त्यात बदल

येत्या काळात ही प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच दंत महाविद्यालयाच्या परिसरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या दालनांमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे दंत महाविद्यालयातील रुग्णालय पुन्हा सुरू होणार असून पालिकेच्या लसीकरण केंद्राचा पत्ता बदलणार आहे.