लॉटरी व्यावसायिकाकडून पैशांची मागणी

ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याविरोधात लॉटरी व्यावसायिकाकडून महिना दीड लाख रुपयांचा हप्ता मागितल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

तक्रारदार ठाण्यात राहत असून त्यांचा लॉटरीचा व्यवसाय आहे. ७ ऑक्टोबरला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेतील युनीट एकचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांना जुगार खेळताना पकडले होते. तसेच तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांच्या खिशातून नऊ हजार रुपये काढून घेतले. या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांना गाठले. तुम्ही जुगार खेळा, तुम्हाला कोणी अडविणार नाही. मात्र त्यासाठी दररोज पाच हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली. त्यास तक्रारदार यांनी नकार दिला. काही वेळाने पुन्हा राजेंद्र पाटील हे कोर्टनाका येथे तक्रारदार यांना भेटले. मित्रांविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांनी तक्रारदार यांना दिली. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने १० हजार रुपये तक्रारदाराकडून घेतले. तसेच जुगार अड्ड्यावरील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पुन्हा महिना दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी पैसे देण्यास पुन्हा नकार दिल्याने राजेंद्र पाटील यांनी जुगार खेळल्याची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात केली.

दरम्यान, १६ ऑक्टोबरला राजेंद्र पाटील तक्रारदार यांना पुन्हा भेटले. त्यांनी पैशांची मागणी केली असता तक्रारदार यांनी जुगार खेळणे सोडल्याचे सांगितले. तुमच्या मित्राला युनीट एकच्या कार्यालयात चौकशीसाठी बसविल्याचे सांगून तक्रारदाराकडून राजेंद्रने एका दुकानातून कपडे विकत घेतले. सात शर्ट आणि एक टी शर्ट असे १० हजार रुपये किमतीचे कपडे होते. पाटील यांच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून तक्रारदाराने त्यांच्याविरोधात दीड लाख रुपये खंडणी मागितल्याची तसेच १९ हजार रुपये वसूल केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यांना अद्याप अटक केली नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.