कल्याण : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे शहरातील जे भाजप किंवा अन्य पदाधिकारी आयोजन करीत आहेत, त्यांच्यावर कल्याण, डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कल्याणमधील खडकपाडा, महात्मा फुले, खडकपाडा, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या यात्रेच्या १० हून अधिक आयोजकांवर साथ प्रतिबंधक, मनाई आदेश धुडकावणे, गर्दी जमविणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले.   करोनाचे नियम धुडकावून या यात्रेचे आयोजन केल्याने भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, संजय ऊर्फ बब्लू तिवारी, रिक्षा संघटना पदाधिकारी दत्ता माळेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांवर मानपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

करोनाचे नियम सर्वसामान्य आणि राजकारणी यांना सारखेच आहेत. सर्वांनीच पालन केले पाहिजे, असा टोला कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जनआशीर्वाद यात्रेतील गर्दीवरून लगावला.