बदलापूरमध्ये संदेश प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून जोरदार खरेदी; अंतरनियमाचा फज्जा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : शनिवारपासून आठ दिवस कडक टाळेबंदी लागू होणार असल्याच्या चर्चेने शुक्रवारी बदलापूर बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. गुरुवारी पालिका मुख्यालयात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शहरात कडक र्निबध लावण्यात येतील, अशी माहिती प्रसारित झाली. फक्त औषधालये सुरू राहतील, असे संदेश प्रसारित झाल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मात्र टाळेबंदीची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यास जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे संभ्रम कायम होता.

कुळगाव-बदलापूर नगरपालिका मुख्यालयात गुरुवारी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत पालिका, पोलीस अधिकारी, माजी लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत मुरबाडच्या धर्तीवर आठ दिवसांची कडक टाळेबंदी करण्याबाबतचा प्रस्ताव आमदार कथोरे यांनी मांडला. ही बैठक संपन्न होताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शनिवारपासून बदलापूर शहरात कडक टाळेबंदी लागू करणार असल्याबाबतचा संदेश चित्रफितीतून दिला. मात्र कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने काय सुरू आणि काय बंद याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही. चित्रफीत आणि संदेश शहरभर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारपासून टाळेबंदी होणार असल्याने नागरिकांनी शुक्रवारी सकाळपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेतली. सर्वाधिक गर्दी शहरातल्या किराणा दुकानांवर झाली होती. बदलापूर पश्चिमेच्या बाजारपेठांमध्ये रस्ते गर्दीने खच्चून भरले होते. त्यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी अंतरनियमांचा फज्जा पाहायला मिळाला. भाजी, दूध, एमटीएम, बँकेतही नागरिकांनी मोठमोठय़ा रांगा लावल्या होत्या.

स्थानक आणि बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बस स्थानक, उड्डाणपूल, मांजर्ली रस्ता, रमेशवाडी रस्ता कोंडीत अडकला होता. भाजी विक्रेत्यांनीही चढय़ा दराने विक्री केली, तर नागरिकांनी दोन ते तीन दिवसांसाठी दूध खरेदी केल्याने शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता.

परवानगीसाठी पत्र

दुपारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवार, ८ मे ते रविवार १५ मेपर्यंत कडक टाळेबंदीसाठी परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र दिले. यात फक्त औषधालये, दवाखाने, बँका सुरू राहतील. तसेच जेवण, नास्ता, दूधपुरवठा, किराणा दुकान भाजीपाला यांच्या घरपोच सेवेला परवानगी असेल, त्याव्यतिरिक्त सर्व सेवा बंद राहतील, असे त्यात नमूद केले आहे. सायंकाळपर्यंत या मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे शनिवारपासून कडक टाळेबंदीबाबत संभ्रमाचे वातावरण होते.

टाळेबंदीला राजकीय पक्षांचा विरोध

मुरबाडसारख्या ग्रामीण तालुक्याच्या धर्तीवर बदलापूर शहरात टाळेबंदीची मागणी करणे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली. राज्य शासनाच्या टाळेबंदीची अंमलबजावणी केली तर वेगळ्या टाळेबंदीची गरज नाही, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केल.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनीही हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय असून त्यामुळे अधिकच गर्दी वाढल्याची प्रतिक्रिया दिली. उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या महिला अध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी दिली.

कडक टाळेबंदीचा संदेश प्रसारित झाल्यानंतर बदलापूरमधील बाजारपेठेत गर्दी उसळली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowds in the market fear of layoffshefty citizens badlapur inter regulation ssh
First published on: 08-05-2021 at 01:30 IST