पाच महिन्यांपासून भ्रमणध्वनी मनोरा बंद अवस्थेत; ऑनलाइन कामे ठप्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू तालुक्याच्या सायवन गावातील एकमेव भ्रमणध्वनी मनोरा (मोबाइल टॉवर) सुमारे पाच महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नेटवर्कच नसल्याने ऑनलाइन कामेही ठप्प झाली आहेत.

डहाणू तालुक्याच्या डोंगरी भागात असलेल्या सायवन गावात सुमारे सहा हजार लोकवस्ती आहे. अनेक गावांना एकमेकांशी संपर्क करता यावा यासाठी सात वर्षांपूर्वी येथे भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून तो बंद आहे.

त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सायवन, चळणी, गांगोडी, निंबापूर, बांधघर, बापुगाव, सेंसरी, रामपूर, व्याहाळी या गावपाडय़ांचा संपर्क तुटला आहे. सर्वच ऑनलाइन कामांसह आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

बँकांचे आर्थिक व्यवहार इंटरनेटमार्फत होत असल्याने संपर्क नसल्याने व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. बँकांची सकाळची वेळ साडेदहा असताना ग्राहक मात्र सकाळी सात वाजताच रांगा लावून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत उभे राहत आहेत. वृद्ध, निवृत्तिवेतनधारक, महिला, विद्यार्थी व अन्य ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एका दिवसात नंबर लागला नाही तर दोन ते तीन दिवस सतत फेऱ्या माराव्या लागतात.

सायवन येथील ग्रामस्थांना नेटवर्कसाठी गावापासून एक किलोमीटर पुढे टेकडीवर जावे लागते. दरवेळी संपर्क साधण्यासाठी एवढे अंतर लांब जाणे शक्य नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी भ्रमणध्वनी मनोरा यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आरोग्य सेवेवर परिणाम

सायवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पंधरा गावे येतात. येथील ग्रामीण जनता पूर्णपणे सायवन आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मात्र नेटवर्कच नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या १०८ या रुग्णवाहिका सेवेशीही संपर्क होत नाही. या सुविधेपासून गंभीर रुग्ण, गर्भवती महिला, सर्पदंश झालेले रुग्ण वंचित राहत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahunu village outside the contact
First published on: 30-10-2018 at 01:45 IST