tvlogडॉक्टर झाल्यावर व्यवसाय करायला लागलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक कानमंत्र दिला, की तुझ्या उत्पन्नातला तीस टक्के हिस्सा समाजासाठी खर्च कर. मी तो नियम आजतागायत पाळत आलो आहे.’ गेली तीस-बत्तीस वर्षे पंढरपूरच्या वारीतील वारकऱ्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत आपलं तीस टक्क्य़ाचं गणित सोडवणारे डॉ. ओमप्रकाश शुक्ला हे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
या ‘गणिताच्या’ कृतीतील पायऱ्या त्यांच्या बोलण्यातून सहज दिसून येतात. मूळ गाव गोरखपूर. पुणे विद्यापीठातून इंटरची पदवी घेतल्यानंतर १९७४ साली ठाण्यात व्यवसायाचा त्यांनी आरंभ केला. सुरुवातीची सात-आठ वर्षे ‘प्रपंच करावा नेटका’ हे आचरणात आणून त्यानंतर परमार्थ साधण्यासाठी ‘गरिबांच्या’ शोध मोहिमेकडे ते वळले. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांमधून सकृतदर्शनी जे ‘गरीब’ वाटतील, त्यांना मोफत औषधे देऊ लागले. एकदा गंमतच झाली. एका बाईंना ‘ताई तुम्ही पैसे देऊ नका, राहू देत’ असं सांगताच ‘मी काही गरीब नाही’ असा चढा सूर तिने आळवला. त्याक्षणी डॉ. शुक्ला यांनी खोपटला ‘खोपटय़ात’ दवाखाना थाटणारा मीच फक्त गरीब आहे, अशी मनाची समजूत घालून घेतली आणि मदतीसाठी दुसरा पर्याय ते शोधू लागले.
नेमकं त्याच वेळेला जांभुळपाडय़ाला पूर आला, संगमेश्वरला दरड कोसळली आणि ‘वैद्यकीय’ सेवेचा हात देण्यासाठी डॉक्टर तिकडे धावले. वि.हिं.प.च्या साठे काकांच्या आग्रहावरून गणपती मंदिराच्या स्थापनेनिमित्ताने देवभानला गेले आणि महिन्यातला एक रविवार देवभानला देण्याचे ‘भान’ त्यांनी कायम राखले. श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून वारीतील लोकांसाठी दोन कम्पाऊंडरची व्यवस्था करताना डॉक्टरांच्या मनात विचार आला की ‘आपण शेवटचे दोनचार दिवस तिथे जाऊन बघून आलो तर..’ शुभस्य शीघ्रम् म्हणत डॉक्टरांनी विचार कृतीत आणला. वारीहून ते परतले ते एक निर्णय घेऊनच. ‘आपणच ही वैद्यकीय सेवा दिली तर..’ डॉक्टरांच्या तीस टक्क्य़ाच्या शोधाला योग्य दिशा मिळाली.
श्री ज्ञा.से.मं.च्या संमतीने १९८७ पासून डॉक्टरांची वारी सुरू झाली. सुरुवातीला दोन डॉक्टर व दोन कम्पाउंडर जीप घेऊन जायचे. दिवसभर रुग्णसेवा, रात्री शेतात उघडय़ा माळरानावर झोप, पावसालाही यावंसं वाटलं तर दिंडीच्या तंबूत ‘घुसखोरी’ करावी लागेल. दरवर्षी डॉ. शुक्लांबरोबर येणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढत गेली. सेवेतून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची लागण लागत गेली. आजमितीस दहा डॉक्टर्स आणि दहा कार्यकर्ते अशी वीस जणांची ‘बस’ रवाना होते. वीस जणांच्या आठ दिवसांच्या पोटपूजेसाठी लागणारा किराणा माल आणि औषधं यांचा ट्रक सोबत असतो. पाण्याची सोय बघून एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत दवाखाना थाटला जातो. ४० बाय ४० एवढे मोठे प्लास्टिक अंथरले जाते. डॉक्टरांच्या कामाची विभागणी होते. वारकरी, गावकरी यांची रांग लागते. दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत काम चालूच राहाते. सगळे जास्त करून वयोवृद्ध, थकलेले भागलेले रुग्ण असतात. कधी कधी एका वेळी तीसपस्तीस जणांना सलाइन द्यावे लागते. झाडाच्या फांद्यांना दोऱ्या बांधल्या जातात. सलाइनची बाटली त्याला अडकवली जाते. शिवाय ट्रकला पण बाटली अडकवण्यासाठी हुक्स लावलेले असतात. ट्रकखाली प्लास्टिकवर आपलं गाठोडं उशाशी घेऊन रुग्ण आडवे होतात. औषध-गोळ्यांचा खुराक घेऊन, मलमपट्टी करून टुकटुकीत होतात आणि ‘हरी मुखे म्हणा’ म्हणत पावलांना गती देतात. वारीत पाच ते सात हजार रुग्णांवर उपचार केले जातात.
वाघुले काकू, हेमा देशमुख, रेणुका शिंदे आणि ‘अवघे पाऊणशे वयमान’ असूनही समोरच्याला थक्क करणारा ‘उत्साह’ असणाऱ्या विभावरी जोशी ‘अन्नपूर्णेची’ भूमिका प्रेमाने निभावतात. सगळ्या डॉक्टरांना, सहकाऱ्यांना आग्रहाने खाऊपिऊ घालतात.  .
फलटण, वालेगांव (बरड), नातेपुते हा मुक्काम झाला की पथक थेट पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे मुखदर्शन घेते. ‘पुढच्या वर्षी परत बोलव’ हे एकच मागणे विठुरायाच्या चरणाशी मागितले जाते. माळशिरस, वेळापूर, वाडी कुरोळी, गादेगांव (वाखरी) झालं की परतीचा प्रवास करून एकादशीला ठाण्यात हजर. हा फिरता दवाखाना आणि मोफत उपचार करण्यामागे पुढाकार, नियोजन आणि मेहनत डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांची.
कोणत्याही रुग्णाला डॉ. शुक्लांना पैसे द्यावे लागत नाहीत. उलट वेळ पडली तर रुग्णाची आस्थेने चौकशी करून, उपचार करून, अडचण ओळखून रुग्णाला घरी पाठवण्यासाठी ‘अर्थ व्यवस्था’ डॉ. शुक्ला सढळ हाताने करत असतात. जनसेवेचे कंकण हाती बांधल्यामुळे उभा महाराष्ट्र आपल्याला ओळखू लागला याबद्दल डॉ. शुक्ला यांना कृतकृत्य वाटते. वि.हिं.प., दगडूशेठ हलवाई यांच्यापाठोपाठ ही ‘ईश्वरसेवेची’ संधी मिळाल्याचा त्यांना अभिमान वाटतो.

women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?