शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम

जुलै महिन्यात वसई-विरार शहरात आलेल्या पुरामुळे वसईत अनेक दिवस जागोजागी पाणी साचलेले होते.

(संग्रहित छायाचित्र)

‘एव्हरशाइन’मधील दहा डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात

वसई-विरार शहरात डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. एकटय़ा वसई नगरी आणि एव्हरशाइन येथील दहा डेंग्यूचे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. वसई विरारच्या इतर भागांतही डेंग्यूने थैमान घातलेले आहे.

साचलेल्या पाण्यातून डेंग्यूच्या अळ्या तयार होऊन जीवघेणा डेंग्यू रोग होतो. जुलै महिन्यात वसई-विरार शहरात आलेल्या पुरामुळे वसईत अनेक दिवस जागोजागी पाणी साचलेले होते. या साचलेल्या पाण्यामुळे वसईत विरार शहरात डेंग्यूची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी वसई पूर्वेच्या एव्हरशाइन आणि वसंत नगरी येथे डेंग्यूच्या रोगाचे संशयित रुग्ण आढळल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते.

प्रभाग समिती सभापती नीलेश देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन आरोग्य विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आचोळे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूचे ३ रुग्ण तर नवघर पूर्व येथील नागरी आरोग्य केंद्रात डेंग्यूचे ७ रुग्ण दाखल असल्याची माहिती पालिकेने दिली.

हे सर्व रुग्ण एव्हरशाइन आणि वसंत नगरी परिसरातील आहेत. आरोग्य विभागाने या सर्व विभागांचे सर्वेक्षण केले असून रुग्णाच्या कुटुंबीयांचीही तपासणी केली आहे. या भागात सर्वेक्षण करून डेंग्यू मच्छरांच्या अळ्यांचा शोध घेतला, रुग्णांच्या नातेवाईकांची रक्त तपासणी केली, परिसरात धूर आणि औषध फवारणी केली अशी माहिती नवघर पूर्वच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे यांनी अहवालात दिली आहे.

आम्ही डेंग्यूची लागण होऊ  नये यासाठी या सर्व परिसरात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती प्रभाग समिती सभापती नीलेश देशमुख यांनी दिली. आमच्याकडे औषधांचा पुरेसा साठा असून रुग्णांच्या उपचारात कुठल्याच प्रकारची कमतरता राहणार नाही, याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

प्रभाग समिती  अधिकाऱ्यांना अगरबत्ती भेट

डेंग्यूचा उपद्रव वसईच्या प्रभाग समिती आय परिसरातही पसरलेला आहे. मच्छरांचा उपद्रव आणि पालिकेकडून औषध फवारणी आणि इतर उपाययोजना होत नसल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. काँग्रेसचे नेते किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच प्रभाग समिती आयच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांना मच्छर अगरबत्तीची प्रतीकात्मक भेटही देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dengue incidence prevails in the city