बदलापुरात शिवसेनेचे जाधव नगराध्यक्ष, भाजपच्या घोरपडे उपनगराध्यक्षपदी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या प्रेमाचा दुसरा अंक कुळगाव-बदलापूर नगराध्यक्ष निवडणुकीत पाहायला मिळाला. नगरपालिकेत एकहाती संख्याबळ असतानाही शिवसेनेने भाजपला सत्तेत सामील करून घेतले आहे. सेनेचे प्रियेश जाधव यांची नगराध्यक्षपदी तर भाजपच्या राजश्री घोरपडे उपनगराध्यक्षपदी निवड झाली.

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यात प्रियेश जाधव आणि राजश्री घोरपडे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सव्वा वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवसेना, भाजपचे वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी एकत्र पाहायला मिळाले. पहिल्यांदाच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश पाटील या वेळी उपस्थित होते. २०१५ मध्ये शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढत पालिकेत सत्ता स्थापन केली होती. सव्वा वर्षांनंतर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला शिवसेनेने सोबत घेतले होते. त्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षांत दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे अडीच वर्षांनंतर शिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या युतीमुळे शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर एकत्र येण्याची वेळी आली.

भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय?

आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्यांना अधिक संधी दिली जात असल्याची चर्चा बदलापुरात रंगली होती. उपनगराध्यक्षपदी राजश्री घोरपडे यांची निवड झाल्याने पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या कथोरे समर्थकांनाच महत्त्वाची पदे दिली जात असल्याने भाजपमधील निष्ठावंतांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे.