सुविधांचा ताबा घेण्यास संस्था, व्यक्ती पुढे येत नसल्याने वास्तू वापराविना

कल्याण : कल्याण पूर्वेतील रहिवाशांना घराजवळ पुरेशा नागरी सुविधा असाव्यात या उद्देशातून खासदार, आमदार यांच्या विकास निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय आणि सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. या सुविधांचा ताबा घेण्यास संस्था, व्यक्ती पुढे येत नसल्याने त्या कुलूपबंद आहेत.

या वास्तू रहिवाशांना खुल्या करून दिल्या तर नियंत्रक नसल्याने येथे गैरप्रकार होण्याची भीती आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय आणि स्वच्छतागृह या कामांसाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या विकास निधीतून एकूण ५७ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोर मध्यवर्ती ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय आहे. त्याच्या बाजूला स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा, क्रांतिकारक स्मारकासाठी आ. गायकवाड यांनी सात लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या कट्टय़ाचे जानेवारीमध्ये उद्घाटन करण्यात आले. या कट्टय़ाचा ताबा घेण्यास कोणतीही संस्था, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तयार नसल्याने या वास्तुला टाळे आहे.

याच जागेतील वाचनालय, अभ्यासिकेच्या वास्तूसाठी खा. डॉ. शिंदे यांनी १५ लाख, आ. गायकवाड यांनी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. चार महिन्यांपूर्वी या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. लाखो रुपये खर्च करून या तिन्ही वास्तूंना टाळे लागले आहे. स्वच्छतागृह बांधण्यापूर्वी त्याच्या आसपास किती शौचालये आहेत याची चाचपणी करणे आवश्यक होते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

स्वच्छतागृह ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर एका ठेकेदाराला चालविण्यास दिले होते. या ठिकाणी दिवसभरात जेमतेम ३० रुपयांचाही व्यवसाय होत नाही. या स्वच्छतागृहापासून १०० मीटर अंतरावर मोफत वापराची दोन स्वच्छतागृह आहेत. नवीन स्वच्छतागृहासाठी ठेकेदार मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते. त्याला प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती नगरसेविका मंढारी यांनी दिली.

‘वाचनालयाच्या वास्तूत काम सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक कट्टा स्थानिक रहिवासी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी चालविण्यास घेतले पाहिजे. यासाठी प्रशासन सहकार्य देण्यास तयार आहे. कोणीही ज्येष्ठ नागरिक कट्टय़ाची जबाबदारी घेण्यास तयार नाही. या वास्तू अशाच खुल्या ठेवल्या तर तेथे गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.

– शीतल मंढारी, स्थानिक नगरसेवक

स्वच्छतागृह चालविण्यासाठी पाच एजन्सींचे प्रस्ताव आले होते. एका एजन्सीने ते चालविण्यास घेतले होते. वीज देयक, दैनंदिन मिळकत येथे खूप कमी आहे. त्यामुळे ठेकेदाराने स्वच्छतागृहाचा ताबा पालिकेला देऊन काम सोडले. नवीन एजन्सी बघण्याचे काम सुरू आहे.

– घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण