बोईसरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

अश्रू पुसण्याच्या नावाखाली शिवसेनेने राजकीय संधीसाधूपणा केला आहे. दिवंगत वनगा यांचेच कार्य पुढे नेण्यासाठी राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. रक्त तर सर्वाचेच लाल असते. पण, खंडणीखोरांनी आम्हाला भगव्या रक्ताबाबत सांगू नये. त्या कारणासाठी आम्ही भगवा झेंडा हाती घेतला नाही. आम्ही झेंडा हाती घेतला, तो भारतीयत्वासाठी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोईसर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये केले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचारासाठी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोईसर येथे सभा झाली.

या वेळी मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, इतकी गर्दी समोर पाहून माझ्या मनात आता कोणतीही शंका नसून राजेंद्र गावित हेच मोठय़ा मताधिक्क्याने लोकसभेत निवडून येतील, असा विश्वास आहे. दिवंगत चिंतामण वनगा यांनी नऊ निवडणुका लढविल्या. काही वेळा जिंकले, काही वेळा हरले. पण कधीही आपल्या खांद्यावरून कमळाचा झेंडा खाली ठेवला नाही. दिवंगत चिंतामण वनगा यांचे निधन झाले, तेव्हा साधी संवेदना व्यक्त करण्याचे सौजन्य शिवसेनेने दाखवले नाही, असे ते म्हणाले.

बोईसरकरांना आश्वासने

बोईसरला नगरपालिकेची स्थापना केली जाईल. बोईसरमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारला जाईल. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासाठी हे सरकार काम करत आहे. त्यासाठीच्या विविध योजना पंतप्रधान मोदी यांनी आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.