सध्या राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी असा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगताना दिसतोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मागील दोन भाषणांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टीका केल्यापासून या वादाला तोंड फुटलेलं आहे. भाजपाची भूमिका राज ठाकरे मांडत असल्याची टीका शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. मात्र आता या टीकेला राज्येच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत उत्तर दिलंय.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, नाहीतर…”; राज ठाकरेंना पत्रकार परिषदेमधून इशारा

“निवडणुकीमध्ये जेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबत होते तेव्हा त्यांना त्यांचे बोल गुलूगुलू वाटत होते, गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर त्यांना खाजवायला होत आहे,” असा टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांवर निशाणा साधताना लगावलाय.

“मला असं वाटतं की कुठेतरी राज ठाकरेंचा घाव वर्मी लागतोय. भाजपाला कोणालाही समोर करायची गरज नाहीय. भाजपा सक्षम आहे,” असा टोला राज ठाकरेंच्या आडून भाजपाचं म्हणणं मांडलं जात असल्याच्या टीकेवरुन फडणवीसांना लगालाय.

“आम्ही पोलखोल यात्रा सुरु केलीय. रोज पोलखोल करतोय. आमच्या या पोलखोल यात्रेने सरकार आणि सरकारी पक्ष हे इतके व्यथित झाले आहेत, की रोज आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ला करतायत. पण त्यांनी कितीही हल्ला केला तरी यांचा भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.

भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या कपिल पाटील फाऊंण्डेशनच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी हा टोला लगावला. या प्रतिक्रियाचा व्हिडीओ फडणवीसांनीच शेअर केलाय.