डायलिसिसचा खर्च आवाक्यात!

शहरात आणखी दोन ठिकाणीही डायलिसिस केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

तीन रुग्णालयांत महापालिकेची केंद्रे; गरीबांना मोफत सुविधा, सामान्यांनाही सवलत

मूत्रपिंडाशी संबंधित विकार असलेल्यांच्या शरीरातील अनावश्यक पाणी तसेच अन्य विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी करण्यात येणारी ‘डायलिसिस’ उपचारपद्धतीचा फायदा आता ठाण्यातील गरीब रुग्णांनाही घेता येणार आहे. ठाणे महापालिकेने वर्तकनगर, कोपरी आणि कासारवडवली येथील रुग्णालयांमध्ये उभारलेली डायलिसिस केंद्रे सोमवारपासून खुली करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या रुग्णांना मोफत उपचार सुविधा देण्यात येणार असून आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना निम्म्या दरात या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. शहरात आणखी दोन ठिकाणीही डायलिसिस केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. या लोकसंख्येमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित विकारांचे दीड ते दोन टक्के रुग्ण (सुमारे २० हजार) असून त्यांना आठवडय़ातून एकदा वा दोनदा डायलिसिस करावे लागते. खासगी रुग्णालयांत एका डायलिसिससाठी सुमारे १८००-२००० रुपये इतका खर्च येतो. हा खर्च परवडत नसल्याने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गातील रुग्ण या उपचारांना मुकतात. या पाश्र्वभूमीवर, ठाण्यात विविध ठिकाणी डायलिसिस केंद्रे उभी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार कासारवडवली येथील रोझा गार्डिनिया रुग्णालय, वर्तकनगर येथील कोरस रुग्णालय आणि कोपरी प्रसूतीगृह या तिन्ही सेंटरची कामे पूर्ण झाली असून त्याचे उद्घाटन बुधवारी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला असला तरी काही तांत्रिक कारणास्तव येत्या सोमवारपासून ते रुग्ण सेवेसाठी खुले केले जाणार आहेत.

कासारवडवली येथील रोझा गार्डिनिया रुग्णालय, वर्तकनगर येथील कोरस रुग्णालय आणि कोपरी प्रसूतीगृह या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी दहा खाटा आणि डायलिसिस यंत्र बसविण्यात आले आहे. एका रुग्णावर डायलिसिस प्रक्रिया करण्यासाठी साधारण तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे एका सेंटरमध्ये दिवसाला एकूण ४० रुग्णांवर डायलिसिस केले जाणार आहे. तसेच डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाजवळील आरोग्य केंद्र आणि सी.आर.वाडिया रुग्णालयामधील डायलिसिस सेंटरचे काम पूर्ण होत आले असून येत्या महिन्याभरात याठिकाणीही डायलिसिसची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे एका दिवसात दोनशे रुग्णांवर डायलिसिस करणे सोपे होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी दिली.

गरीब-श्रीमंतांना उपचार

  • कासारवडवली येथील रोझा गार्डिनिया रुग्णालय, वर्तकनगर येथील कोरस रुग्णालय आणि कोपरी प्रसूतीगृह येथील डायलिसिस केंद्रे एकां खासगी कंपनीमार्फत चालवण्यात येणार आहेत.
  • याठिकाणी एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना मोफत डायलिसिसची सेवा दिली जाणार असून, त्यासाठी त्यांच्याकडे केशरी रेशनिंग कार्ड असणे गरजेचे आहे.
  • आठ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना ५० टक्के सवलत दिली जाणार असून त्यासाठी त्यांच्याकडे आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे.
  • आठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या रुग्णांकडून मात्र १०४० रुपये असे पूर्ण शुल्क आकारले जाणार असून हे शुल्क खासगी रुग्णालयांच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपयांनी कमी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dialysis expenses tmc