एक महिन्यापासून बंद असून प्रशासनाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली स्मशानभूमीच्या आवारात असलेली पालिकेची डिझेल शवदाहिनी गेल्या महिनाभरापासून बंद असल्याचे समोर आले आहे. शवदाहिनी बंद असल्याने नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यासाठी मोठा खर्च येत असून करोनाच्या संकटात पालिका प्रशासनाकडून याबाबत दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पालिका प्रशासनाने महिनाभरानंतरही यावर उपाययोजना न केल्याने नागरिकांत संताप आहे.

बदलापूर शहरात २२ वर्षांपूर्वी मांजर्ली भागातील मोहनानंद नगर येथील स्मशानभूमीत डिझेल शवदाहिनी बसवण्यात आली होती. शहरात गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने लोकसंख्या वाढली असली तरी शहरात एकच शवदाहिनी उपलब्ध आहे. त्यामुळे या शवदाहिनीवर मोठा भार असतो. करोनाच्या संकटात या शवदाहिनीचा मोठा वापर झाला. या शवदाहिनीत मोफत दहन केले जाते. मात्र गेल्या महिनाभरापासून ही शवदाहिनी बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे. डिझेल शवदाहिनी बंद असल्याने इच्छा असूनही पारंपरिक पद्धतीच्या अंत्यविधीचा पर्याय नागरिकांना स्वीकारावा लागत आहे. त्यासाठी मोठी रक्कम, वेळ आणि श्रम लागत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. अनेकदा पारंपरिक स्मशानात गर्दी असल्याने शव घेऊन जागा रिकामी होण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे डिझेल शववाहिनी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

शवदाहिनीची दुरवस्था

मांजर्ली स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनीची चिमणी तुटली असून उर्वरित भाग गंजलेला आहे. तुटलेल्या अवस्थेत याचा वापर झाल्यास आसपासच्या परिसरात धूर आणि राख पसरते.याबाबत स्थानिक सुज्ञ नागरिक तुषार साटपे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना पत्राद्वारे परिस्थितीची माहिती दिली. मात्र त्यावर अद्याप काहीही होऊ  शकलेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diesel cremation machine faulty in badlapur zws
First published on: 26-01-2021 at 00:06 IST