शिवकाळातील इतिहासाचे एक पान असलेल्या कल्याणकडे सुभेदारपद होते. आजच्या इंटरनेटच्या काळात कल्याण रेल्वे स्थानकात काही दिवसांत ‘वाय-फाय’ येईल, पण त्यासोबत गलिच्छ रेल्वे स्थानक परिसर आणि वाहतूक कोंडीची ‘सुभेदारी’ही चालून आली आहे. त्यात शहरातील बेकायदा रिक्षा थांबे, प्रदूषणकारी जुनाट रिक्षा आणि प्रवाशांनी स्वत:ला घालून घेतलेली बेशिस्तीची सवय अशा कारणांमुळे ही ‘सुभेदारी’ पुढेही अशीच कायम चालू राहणार आहे, याची भीती आहे.  
कल्याणमध्ये ठाण्यासारखा एकही अधिकृत रिक्षा थांबा नाही. प्रवाशांची सोय हे साधे तत्त्व पालिकेकडेही नाही आणि त्याची शिस्त प्रवाशांनी स्वत:ला घालून घेतलेली नाही. त्यामुळे प्रवाशीही स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घ्यायला तयार आहेत. रेल्वे स्थानकाचा परिसर काही कायदेशीर आणि बऱ्याच बेकायदा रिक्षा थांब्यांनी गजबजलेला आहे. रेल्वे महापालिकेने दिलेल्या अधिकृत जागेत काही रिक्षा थांबे आहेत; परंतु येथील बहुतेक थांबे हे बेकायदा आहेत. रिक्षाचालकांच्या मर्जीनुसार आणि वर मुजोरी करून भररस्त्यात रिक्षा लावल्या जातात. या प्रकारामुळेच वाहतूक कोंडीचा विळखा तासागणिक आवळत जातो आणि ध्वनी आणि हवेतील प्रदूषणाची पातळी विक्रमी थराला पोहोचते, हे कटू सत्य आहे. खडकपाडा, बेतुरकरपाडा, लाल चौकी या कल्याणातील विभागांत जाण्यासाठीच्या तर उल्हासनगर व परिसरात जाण्यासाठीचे थांबे कायदेशीर आहेत. रेल्वे स्थानक परिसरांतच बस स्थानकही आहे. बस स्थानकाच्या बाहेरच मेट्रो मॉल, डोंबिवली या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा, तर तेथेच काही अंतर सोडून भिवंडी येथे जाणाऱ्या रिक्षांचा गराडा असतो. त्यामुळेच बसस्थानक परिसरात खासगी वाहने, बाहेरगावी बस, विविध विभागांत जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा एकत्रित आल्यामुळे मुंगीलाही शिरायला वाव नसतो. या ठिकाणी रिक्षाचालक कायदे-नियमांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता रिक्षा उभ्या करतात. वाहतूक कोंडी ही त्यांच्यासाठी आनंद लुटणारी गोष्ट ठरली आहे, हे सर्वात दाहक वास्तव आहे.
‘बायपास’ करावीच लागेल
कल्याण शहराच्या भल्याची ज्या कुणाला चाड आहे, त्या मोजक्या लोकांनी, त्या त्या क्षेत्रातील होतकरू जाणकारांनी कल्याणमधील रस्त्यांची वाहने वाहून नेण्याची क्षमता संपली आहे. कल्याण शहरातील वाहनांबरोबरच आसपासच्या शहरांतील वाहनांचा कल्याण शहरातून वावर होत असतो. आसपासच्या शहरांतील आणि बाहेरगावांतून येणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण शहरात प्रवेश करूनच पुढे जावे लागते. यामुळे कल्याणातील शिवाजी चौक, सहजानंद चौक, गणपती चौक (तेलवणे हॉस्पिटल) या प्रमुख चौकांत कल्याण व अन्य शहरांतील वाहनांची भर पडल्यामुळे कोंडी होते. या सगळ्यावर रामबाण उपाय असलेला ‘गोविंदवाडी बायपास’ हा कित्येक वर्षांपासून केवळ चर्चेत आहे. गोविंदवाडी बायपास झाल्यास डोंबिवली व पत्रीपुलावरून येणाऱ्या वाहनांना कल्याण शहरात प्रवेश करावा लागणार नाही. ही वाहने थेट दुर्गाडी किल्ल्याजवळील उड्डाणपुलामार्गे थेट ठाण्याच्या दिशेने जाऊ शकतील. परिणामी कल्याण शहराबाहेरील वाहनांमुळे होणारी कोंडी थांबेल. याचप्रमाणे कल्याणातील काही रस्ते बारा महिने खोदलेलेच असतात. त्यामुळे वाहतूक एका रस्त्यावरून दुसरीकडे वळवावी लागते; अशाने दुसऱ्या रस्त्यावर वाहनांची भर पडल्यामुळे वाहतूक कोंडी होते.
 ..तरच सुटेल वाहतूक कोंडी
 जोपर्यंत ठाकुर्ली उड्डाणपूल, पत्रीपूल-ठाकुर्ली रस्ता, ठाकुर्ली-सावित्रीबाई फुले नाटय़गृह रस्ता, माणकोली उड्डाणपूल, कोन ते कांचनगाव खाडीपूल, कोपर ते मोहने-टिटवाळा वळण रस्ता, गोविंदवाडी रस्ता, शिवाजी चौकात, मानपाडा रस्ता, मंजुनाथ शाळा परिसरात उड्डाणपूल, मुंब्रा-डोंबिवली समांतर रस्ता हे रस्ते, पूल प्रकल्प आकाराला येत नाहीत तोपर्यंत या शहरातील लोकांच्या मागचे वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ठ कमी होणे शक्य नाही.
कचराकुंडीमुळे कोंडी
कल्याण शहराने जपलेला अमूल्य ठेवा म्हणजे येथील रेल्वे स्थानक परिसरातील ‘कचराकुंडी’. महालक्ष्मी हॉटेलजवळ भर रस्त्यात असलेली ही कचराकुंडी येथील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. हॉटेलमधील सगळा कचरा याच कचराकुंडीत टाकला जातो. रिक्षावाले, भाजीवाले, ग्राहक, स्कायवॉकवरून उतरणारे नागरिक या सगळ्यांचा संगम असलेले हे ठिकाण. कचराकुंडीमुळे रस्त्याचा अर्धाअधिक भाग व्यापला जातो आणि वाहतूक कोंडी होते.
‘आरपार’ पार्किंग
कल्याण महानगरपालिकेच्या परिसरांत रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम व विषम तारखेनुसार दुचाकी पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे. परंतु सम/विषम तारखेचे भान न ठेवता नागरिकांकडून वाटेल त्या बाजूस दुचाकी लावण्यात येते. शिवाजी चौकातून शंकरराव चौकाकडे व शंकरराव चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या गाडय़ांचा येथे जोर असतो. रस्त्याच्या दुतर्फी लावलेल्या गाडय़ांमुळे वाहतूक कोंडी होते.
जुन्या गाडय़ा
सोळा वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या जुन्या रिक्षांचा शहरांत वावर असणे अनधिकृत आहे. वाहतूकविषयक अभियान सातत्याने चालू असते, अभियानावेळी जुन्या गाडय़ा असलेले हे रिक्षाचालक पळ काढतात, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरातील रिक्षा, खासगी गाडय़ा आणि यांत या जुन्या गाडय़ांची भर पडल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढते.  
समीर पाटणकर