आधीच गरिबी त्यात पोलिओमुळे आलेले अपंगत्त्व यामुळे आयुष्यापुढे वाढून ठेवलेल्या अडचणींवर मात करून एका जिद्दी माणसाने झोपडपट्टीतून थेट कोकण रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली आहे.
सिध्देश्वर चंदप्पा तेलगु गेली ४६ वर्ष डोंबिवलीत कुटुंबियांसह राहत आहेत. कोकण रेल्वेमध्ये ते महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. याशिवाय कोकण रेल्वेच्या माध्यमातून जम्मूमध्ये धरमकटरा हा ३० किलोमिटर लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या व्यवस्थेचे तेलगु समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे पूल याच रेल्वेमार्गावरील चिनाब नदीवर (३५९ मीटर उंच) बांधण्यात येत आहे. या आव्हानात्मक कामाचे ते साक्षीदार आहेत.
कर्नाटक-आंध्रप्रदेश सीमेवरील रायचूर हे तेलगु यांचे मूळगाव. १९३० च्या दरम्यान सिध्देश्वर यांचे वडिल चंदप्पा नोकरीच्या शोधार्थ पुण्यात नातेवाईकांकडे आले. पत्नी रस्त्यावर बसून भाजीपाला विकत असे. आईला सिध्देश्वर मदत करीत असे. एका भावाचा आजारात मृत्यू झाला. पानशेत धरण फुटले त्यात त्यांची झोपडी वाहून गेली. चार ते पाच दिवस पाण्यात मुक्काम करावा लागला. त्यानंतर सिध्देश्वर यांच्या पायाला वेदना सुरु झाल्या. तपासणीअंती तो पोलीओ असल्याचे निष्पन्न झाले. ऋण काढून वैद्यकीय उपचार केले. त्याचा उपयोग झाला नाही.
मधल्या वेळेत आईला भाजीविक्रीसाठी मदत करायची. बस स्थानकावर काकडी, दारोदार जाऊन घरगुती खाऊच्या वस्तू विकायचा. असे सिध्देश्वरांचे शाळेत जाण्यापुर्वीचे काम. वडील रेल्वेत नोकरीला असले तरी, पगार तुटपुंजा. गावी नातलगांना पैसे पाठवायला लागत. रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केले. ‘यापुढे तुला कष्टाची कामे पायातील अपंगत्वामुळे जमणार नाहीत, म्हणून तू शिक्षण पूर्ण करुन, रेल्वेत नोकरी कर,’ असा वडिलांचा आग्रह होता.
दिवसाच्या मिळणाऱ्या पुंजीतील पैसे बाजुला काढून, त्या शुल्कातून सिध्देश्वर मराठी टंकलेखन, लघुलीपीच्या शिकवणी वर्गात जात. लघुलीपीचे शिक्षण असल्याने सिध्देश्वरना ‘मिलिटरी इंजीनिअरिंग सव्र्हिसेस’मध्ये लघुलेखक म्हणून वर्धा येथे नोकरी मिळाली. त्यानंतर रेल्वे भरतीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिध्देश्वर पश्चिम रेल्वेत अधिकारी पदावर नोकरीला लागले. १९७५ मध्ये तेलगु डोंबिवलीत रहायला आले. सुरुवातील दहा बाय दहाच्या चाळीत काढली. दोन मुले, मुलगी असा संसार वाढत गेला. या कालावधीत तेलगु यांनी रेल्वेच्या विभागीय, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन साहाय्यक कार्मिक अधिकारी पदावरुन थेट ‘इंडियन रेल्वे पसरेनेल सव्र्हिसेस’ ही पदवी मिळवली.
पश्चिम रेल्वेत जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वेत उपमहाव्यवस्थापक, मुख्य जनसंपर्क अधिकारी असे पदभार घेत सध्या सिध्देश्वर कोकण रेल्वेत महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. कोकण रेल्वेच्या जम्मूमध्ये सुरु असलेल्या कामाचे ते समन्वयक आहेत. मुंबई बॉम्बस्फोट काळात हाताळलेली रेल्वेतील परिस्थिती, उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल रेल्वेसह, विविध सामाजिक संस्थांनी सिध्देश्वर तेलगु यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2016 रोजी प्रकाशित
अपंगत्वावर मात करत महाव्यवस्थापकपदापर्यंत वाटचाल
मुख्य जनसंपर्क अधिकारी असे पदभार घेत सध्या सिध्देश्वर कोकण रेल्वेत महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत
Written by भगवान मंडलिक
First published on: 16-03-2016 at 04:49 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disabled person get general manager position