जिल्हाधिकाऱ्यांकडून २५ एकर जमिनीचे ‘आरटीओ’ला हस्तांतरण

ठाणे, कल्याण परिवहन विभागातील (आरटीओ) वाहनांना एकाच वाहनतळावर आणून तेथेच प्रशिक्षणार्थी केंद्र तसेच योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) देण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कंबर कसली आहे. कल्याणमध्ये यासाठी स्वतंत्र वाहतूक केंद्र उभारण्याच्या हालचालींना जोर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ‘आरटीओ’ कार्यालय असल्याने तेथे वाहने उभी करताना चालकांची तारेवरची कसरत होते. ही संपूर्ण यंत्रणा स्वतंत्र भूखंडावर उभारुन तेथे नव्या केंद्राचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कल्याण जवळ प्रादेशिक परिवहन विभागाला (रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस) २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. सुविधा देण्यासाठी जमीन ताब्यात आल्यामुळे ‘आरटीओ’ विभागाने या २५ एकर जमिनीवर आखीव, रेखीव पध्दतीने नियोजन करून या जागेत प्रशिक्षणार्थी वाहन चालकांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र सुरू करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. वाहनांची नियमित तपासणी करण्यासाठी व त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्याची अत्याधुनिक चाचणी परीक्षेची यंत्रणा कशी बसविता येईल, या दृष्टीने विचार विनीमय सुरू केला आहे. या जागेत वाहन परमिट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ‘आरटीओ’तील वरिष्ठ सुत्राने सांगितले.

कोंडीचा जाच टळणार

ठाणे, कल्याण प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणीकृत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनांचे नुतनीकरण, त्यांना योग्यता प्रमाणपत्र देणे या कार्यवाहीसाठी चालक, मालकांना आपली वाहने नियमित ‘आरटीओ’ कार्यालयात आणावी लागतात. वाढत्या नागरीकरणामुळे यापूर्वी शहरांच्या वेशीवर असलेली ‘आरटीओ’ कार्यालय आता मध्यवर्ती ठिकाणी आले आहे. विविध कामांसाठी ‘आरटीओ’त येणाऱ्या वाहनांचा ओघ वाढत चालला आहे. यापुर्वी तुटपुंज्या जागेत असलेल्या ‘आरटीओ’ कार्यालयांना एवढी वाहने एकाच वेळी आवारात सामावून घेणे शक्य होत नसल्याने ही वाहने कार्यालयाबाहेर उभी करावी लागतात. यामुळे कल्याण परिसरात या वाहनांमुळे मोठी कोंडी होत आहे. शासकीय कामानिमीत्त होणाऱ्या या कोंडीवर उतारा शोधण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विशेष म्हणजे, ‘आरटीओ’ कार्यालय एकीकडे आणि योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठीची सुविधा दुसरीकडे असा प्रकार असल्याने अधिकारी, वाहन चालकांची ओढाताण होते. ही सगळी ओढाताण थांबविण्यासाठी परिवहन विभागाने जिल्हा महसूल विभागाकडे कल्याण जवळ एका भूखंडाची मागणी केली होती. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक महसूल विभागाकडून शोध घेऊन कल्याण जवळ २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.

असे असेल केंद्र..

ठाणे, कल्याण ‘आरटीओ’ विभागातील सर्व वाहने योग्यता प्रमाणपत्रासाठी या ‘वाहतूक केंद्रा’मध्ये येतील; अशाप्रकारची व्यवस्था या नवीन जागेत करण्यात येणार आहे. नाशिक ‘आरटीओ’च्या प्रमाणे हे ‘वाहतूक केंद्र’ अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कल्याण, ठाणे ‘आरटीओ’ कार्यालयाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा प्रवास शहरा बाहेरील एका जागेत होणार असल्याने वाहतूक कोंडी रोखणे शक्य होणार आहे. परिवहन विभागातील वरिष्ठांच्या आदेशावरून ठाणे प्रादेशिक अधिकारी जितेंद्र पाटील, कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी या जागेची एकत्रित पाहणी केली आहे. या जागेच्या चतु:सीमा निश्चित करून, तेथे असलेली काही अतिक्रमणे हटविण्याची कामे पूर्ण झाल्यानंतर, प्रत्यक्ष निधीची उपलब्धता पाहून ट्राफिक हबच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, असे ‘आरटीओ’तील एका वरिष्ठ सुत्राने सांगितले.