कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक खासगी डॉक्टरांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. आतापर्यंत या शहरामधील चार डॉक्टरांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. गेल्या महिनाभराची आकडेवारी तपासली असता महापालिका हद्दीत तब्बल दहा डॉक्टरांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. रुग्णांवर उपचार करताना अनाहूतपणे बाहेर पडलेल्या जंतू संसर्गातून ही बाधा झाल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.  
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा यांसारख्या परिसरात आतापर्यंत स्वाइन फ्ल्यूने आजारी असलेले ५२ संशयित रुग्ण आढळले आहेत. यामधील २८ रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महापालिका हद्दीत दोन रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावले आहेत. कल्याणमध्ये राहाणाऱ्या स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या एका महिलेचा बुधवारी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.  महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लीलाधर म्हस्के यांनी स्वाइन फ्ल्यूबाधित रुग्णांवर
योग्य उपचार सुरू आहेत, असे सांगितले.

संसर्गातून डॉक्टरांना बाधा
खासगी रुग्णालय, दवाखान्यांतील डॉक्टरांच्या खोल्या वातानुकूलित बंदिस्त असतात. रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर तो अनेक वेळा खोकतो, शिंकतो. रुग्णावर उपचार करताना डॉक्टर रुग्णाच्या अगदी जवळ असतो. खोलीमध्ये रुग्णाचा संसर्ग पसरतो. डॉक्टरांची खोली बंदिस्त असल्याने त्याची बाधा डॉक्टरांना पटकन होते. कोणताही रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जातात. ही तपासणी करताना पसरणाऱ्या संसर्गातून डॉक्टरांना बाधा होते, असे एका तज्ज्ञ डॉक्टरने सांगितले.