ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची दिमाखदार सुरुवात; शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांचाही हिरिरीने सहभाग

संतांच्या वेशभूषेत वावरणारी लहान मुले, नऊवारी साडय़ा घालून आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आलेल्या महिला, भगवे फेटे आणि गळय़ात शेला घालून फिरणारी साहित्यिक मंडळी अशा प्रचंड गर्दीत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि सामूहिक अभंग गायन करत शुक्रवारी सकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी पार पडली. दिंडीच्या वाटेवर ठिकठिकाणी स्वागतासाठी उभे नागरिक आणि रस्त्यांवर काढलेल्या भव्य रांगोळय़ा यांमुळे शुक्रवारी डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेसारखे चित्र दिसत होते.

श्री गणेश मंदिर संस्थान येथे गणेशपूजन झाल्यानंतर ग्रंथपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, अच्युत कऱ्हाडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संमेलनाचे विद्यमान आणि मावळत्या अध्यक्षांनी पालखीचे भोई होत दिंडी मार्गस्थ केली. बाजी प्रभू चौक, इंदिरा चौक, मानपाडा रोड, चार रस्ता, पारसमणी चौक, शेलार नाका, घरडा सर्कल आदी भागातून दिंडी नेण्यात आली. दिंडी मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता.

दिंडीत ५७ शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थी, १७० शिक्षक, ५५० छात्रसेना व स्काऊटचे विद्यार्थी, ३७ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, १४ चित्ररथ, साहित्यिक, कवी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये १४ लेझीम पथकांचा समावेश होता. िदडींचे स्वागत करण्यासाठी बाजी प्रभू चौक, इंदिरा चौक, पारसमणी चौक, क्रीडासंकुलाचे मुख्य प्रवेशद्वार येथे ढोल व बॅण्डपथक सज्ज होते. संत साहित्य परंपरा, वाचन संस्कृती, राष्ट्रपुरुष, क्रांतिवीर, संतांची परंपरा मांडणारे चित्ररथ पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. मराठी भाषिकांसोबत तामीळ, मल्याळी, बंगाली भाषकांनीही या दिंडीत सहभाग घेतला.

कल्याण, डोंबिवलीतील शाळांसोबत मलंगगड येथील वामनबाबा गोशाळेतील वारकरी संप्रदायाची मुले या दिंडीत सहभागी झाली होती. महिलांनी नऊवारी साडी घालून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. िदडीच्या सुरुवातीला काही महिला या पारंपरिक वेशभूषेत बुलेटवर स्वार झाल्या होत्या. पारसमणी चौकात कवी अशोक नायगावकर यांनी सर्वत्र स्वाक्षरी मराठीत करा, घरी दारी मराठीत बोला, सुटावा पापुद्रा मराठीचा अशी कविता सादर करून ती सर्वाकडून वदवून घेतली. त्यानंतर पु.भा.भावे साहित्यनगरी येथे दिंडी पोहोचली. दिंडीचे स्वागत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सु.रा.पवार यांनी दिंडीचे भावेनगरीत स्वागत केले. तेथे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ग्रंथीदिंडीमुळे शहरातील मानपाडा रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अप्पा दातार चौक व बाजी प्रभू चौकामध्ये वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इंदिरा चौकात वाहन कोंडी झाली होती. पी.पी.चेंबर येथून येणारी वाहने दिंडी इंदिरा चौकात येताच पुन्हा पाठीमागे वळविण्यात येत होती. तसेच मानपाडा रोडवर दिंडी आणि वाहने एकत्र झाल्याने वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आले. वाहतूकपोलीस मध्येच दिंडी अडवून वाहनांना वाट करून देत होते. त्यामुळे क्रीडासंकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला, तरीही दिंडीतील मुले ही संकुलापर्यंत पोहोचली नव्हती.

ग्रंथ प्रदर्शनात ३५० स्टॉल

डोंबिवली  : साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनांमधून कोटय़वधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री व्हावी, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. संमेलन नगरीतील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.  संमेलनातील पुस्तक प्रदर्शनासाठी २५० स्टॉल्सची व्यवस्था आयोजकांनी केली होती. मात्र प्रकाशकांचा प्रतिसाद वाढला. त्यामुळे स्टॉल्सची संख्या वाढविण्यात आली आहे. तब्बल ३५० स्टॉल्स प्रदर्शनात असून विविध विषयांवरील लाखो पुस्तके पाहण्याची संधी  आहे.

राज ठाकरे यांची अनुपस्थिती

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार होते; परंतु निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ते येऊ शकले नसल्याची प्रतिक्रिया मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली. नेत्याने पाठ फिरवताच कार्यकर्त्यांनाही दिंडीचा विसर पडला. संमेलनस्थळी केवळ गटनेते मंदार हळबे उपस्थित होते.

साहित्यिकांचा सहभाग

पुणे येथून मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सोलापूरचे अ‍ॅड. जयंत कुलकर्णी, चाळीसगावचे तानाजी जगताप, भोपाळ येथून सुधाकर भाले, तर कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, वामन देशपांडे, मेघना साने, अशोक म्हात्रे, अरविंद लाखे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, हेमंत राजाराम, सुरेश देशपांडे, अभिनेत्री अश्विनी मुकादम हिनेही उपस्थिती लावली होती. ‘मला आमंत्रण आलेले नाही, मात्र एक वाचक म्हणून माझे काही कर्तव्य आहे आणि ते बजावण्यासाठी मी येथे आले,’ असे अश्विनी म्हणाली.

सीमाभागातील बांधव डोंबिवलीत

बेळगाव, कारवार, निपाणी या सीमाभागातील एक शिष्टमंडळ िदडीमध्ये सहभागी झाले होते. सर्व संमेलनात सीमा भाग महाराष्ट्रात सामील करा असा प्रस्ताव मंजूर केला जातो. डोंबिवलीतही हा प्रस्ताव यावा अशी मागणी करण्यासाठी लक्ष्मण पाटील, चांगप्पा पाटील, प्रदीप मुरकुटे, प्रकाश अष्टेकर, आनंद पाटील, नारायण जाधव, संभाजी तरवरकर हे डोंबिवलीत आले आहेत. त्यांनी बेळगाव कारवार सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील झालाच पाहिजे, अशी घोषणा पु.भा.भावे साहित्यनगरीत दिली.