डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत रसिकांसाठी सावित्रीबाई फुले कलामंदिर उभारण्यात आले, परंतु उभारणीनंतर लगेचच तीन ते चार वर्षांत या कलामंदिराची दुर्दशा झालेली पाहावयास मिळाली. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा कलामंदिराचा पालिका प्रशासन योग्य वापर करत नसल्याने सध्या हे कलामंदिर तोटय़ात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००७ साली साडेसोळा कोटी रुपये खर्च करून कलाप्रेमींसाठी सावित्रीबाई फुले कलामंदिराची उभारणी केली. कल्याण व डोंबिवली शहराला जोडणाऱ्या ठाकुर्लीजवळ हे कलामंदिर आज उभे आहे. वातानुकूलित ९८४ प्रेक्षक क्षमतेचे मुख्य प्रेक्षागृह, अ‍ॅकॉस्टिक्स, उत्कृष्ट प्रकाशयोजना व अंतर्गत सजावट, नाटय़गृहासाठी आवश्यक ग्रीन रूम्स, सराव कक्ष, आराम कक्ष, क्राय खोली, पॅनल रूम यांची बांधणी उत्कृष्टरीत्या करण्यात आली आहे. कलाप्रेमी व कलाकारांकडून मुंबईतही अशा प्रकारचे नाटय़गृह कुठे नसल्याची पोचपावती या कलामंदिराला मिळाली होती, परंतु त्याची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती पालिकेला करता आली नाही. कलामंदिर देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदारांना दिल्यामुळे या ठेकेदारांनी हवे तसे लक्ष येथे दिले नाही.

कलामंदिराचे छत काही वर्षांतच गळायला लागले, कार्पेट फाटले, कलादालनातील भिंती पावसाळ्यात खराब झाल्या. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली हे सर्व पाहता सत्ताधारी पक्षाने नाटय़गृहाचे काम कंत्राटदार करत नसतील तर त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार गेल्या वर्षी कलादालनातील खुच्र्या, कारपेट, तसेच कलादालनाची डागडुजी करण्यात आली. परंतु हे कामही दर्जेदार नसल्याने ते किती दिवस तग धरून राहते हे लवकरच समजेल. त्याबरोबरच विद्युत विभाग वगळता कॅन्टीन, डोअर कीपर, स्वच्छता आदींच्या निविदा आठ-नऊ वर्षे झाली तरी अद्याप निघालेल्या नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कलामंदिराची स्वच्छता, देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नाही. एक कोटींची तरतूद कलामंदिरासाठी पालिका अर्थसंकल्पात करते. त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च दहा ते बारा लाखांच्या वर जातो.

महापालिका परिवहन विभागाकडे नाटय़रसिकांनी तसेच नाटय़ संस्थांनी वारंवार मागणी करून येथे रात्रीच्या वेळेस कलामंदिराकडे जाण्यासाठी बसची सुविधा पुरविण्याची मागणी केली, परंतु ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुळात हे नाटय़गृह नसून कलामंदिर आहे, येथे सर्व व्यावसायिक नाटकांसोबतच वाद्यवृंद कार्यक्रम, शालेय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमही घेतले जातात. यामुळे सुरुवातीला हे नाटय़गृहातून उत्पन्न तरी पालिकेला मिळत होते, परंतु लग्नसमारंभाने नाटय़गृहाची दुरवस्था झाल्याने लग्नसमारंभासाठी नाटय़गृह देणे पालिकेने बंद केले. त्यानंतर केवळ सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, शालेय कार्यक्रम व नाटकांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या कलामंदिराची भिस्त अवलंबून आहे. लग्नकार्यातून ८० लाख ते एक कोटी उत्पन्न पालिकेला मिळत होते, परंतु ते आता बंद झाल्याने ५० लाखांच्या घरात उत्पन्न आले आहे.

नाटकांची माहिती रसिकांना मिळावी यासाठी डोंबिवली पालिका विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी तिकीट खिडकी सुरू केली, परंतु तेथेही योग्य पद्धतीने नाटकांची जाहिरात होत नसल्याचे चित्र आहे.