ठाण्यानंतर एक प्रमुख शहर म्हणून डोंबिवली शहराकडे पाहिले जात आहे. मध्यमवर्गीय, नोकरदारांचे हे शहर. मुंबईत राहणे परवडत नाही म्हणून येथे घरांच्या शोधात राहावयास आलेल्यांची संख्या बरीच मोठी. एका अर्थाने मुंबईशी नाते सांगणारे हे शहर. येथील बाजारपेठ मात्र मुंबईच्या तुलनेत महागाडी ठरूलागल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारी कृषी मालाची घाऊक बाजारपेठ कल्याण-डोंबिवली शहरास लागूनच आहे. तरीही डोंबिवलीत भाज्या, कडधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव ठाणे आणि इतर शहरांमधील बाजारपेठांपेक्षा अवाच्या सवा आहेत. कडधान्य, डाळी, तेल यांचेही भाव या शहरात गगनाला भिडलेले दिसतात. डोंबिवलीचा हा बाजार महाग का याचे कोडे येथील नोकरदारवर्गाला सुटता सुटत नाही. घाऊक मालाची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असूनही येथील भाज्या स्वस्त का नाहीत, असा सवाल येथे कुणीही ठामपणे विचारताना दिसत नाही. मुंबईत दररोज कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदार वर्गानेच या महाग बाजारपेठेला खतपाणी घातले नसावे ना, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती या शहरात आहे.

भाजी विक्रे ता सांगेल त्या दरात भाजी विकत घेणारा ग्राहक डोंबिवलीत दिसतो. त्यामुळे विक्रेते चढे भाव सांगू लागले, असे महागाईचे प्रमुख कारण येथील काही जाणकार व्यक्त करतात. या भावात उतार फारसा झालेला नाही. आठवडय़ातील इतर वारांपेक्षा शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी डोंबिवलीची किरकोळ बाजारपेठ ग्राहकांनी गजबजलेली असते. इतर शहरांमध्ये मॉल संस्कृती वाढत असल्याने नागरिक एकाच दिवशी मॉलला भेट देऊन तेथेच सर्व गोष्टी खरेदी करण्याकडे भर देतात. डोंबिवलीत मात्र मॉल संस्कृतीने फारसे बाळसे धरलेले नाही. त्यामुळे किरकोळीच्या महागडय़ा बाजारपेठेला येथे सध्यातरी पर्याय उभा राहिलेला नाही.

डोंबिवलीतील नागरिकांचे राहणीमान दिवसेंदिवस उंचावत चालले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक वस्तूंचे दर हे गगनाला भिडत असून महागडी डोंबिवली अशी एक नवी ओळख शहराला प्राप्त होत आहे. त्यात भाज्याही मागे नाहीत असे दिसते. डोंबिवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कल्याण शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून भाज्या येतात आणि त्यांची घाऊक दरात मोठय़ा प्रमाणात विक्री होते. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाज्यांचे भाव पाहता ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे आहेत. कल्याणच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी किरकोळीच्या तुलनेत ती फारच कमी आहेत. घाऊक ते किरकोळ या भाज्यांच्या दरांचा प्रवास मात्र अचंबित करणारा आहे. डोंबिवलीत भाज्यांच्या दरात मोठी तफावत आढळून येते. येथे प्रत्येक भाजीचे भाव दुपटीने वाढले असून विक्रेते सांगतील त्या भावात डोंबिवलीकर भाज्या विकत घेत आहेत. डाळी, कडधान्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. डोंबिवलीतील मार्केटमध्ये पुणे, कल्याण, वाशी येथील मार्केटमधून माल येतो. तेथून माल आणण्याचा प्रवासी व मजुरी खर्च, कर याचे प्रमाण पाहता या भावात तफावत होत असल्याचे विक्रेते सांगतात.