मागणी वाढल्याने टँकर वितरकांकडून सूचना; पाण्याचा भाव वधारला
बारवी धरणातील पाण्याचा साठा आटू लागल्याने कल्याण- डोंबिवलीकरांना पाण्याची तहान भागविण्यासाठी दिवसेंदिवस खासगी टँकर वितरकांवर अवलंबून राहावे लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाणीकपातीच्या दिवसांमध्ये टँकरने पाणीविक्री करणाऱ्या वितरकांचा भाव चांगलाच वधारूलागला असून टंचाईग्रस्त भागांमध्ये दहा हजार लिटर पाण्याचा एक टँकर दोन ते अडीच हजार रुपयांना मिळू लागल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. विशेष म्हणजे, टँकर मागविण्यासाठी दोन ते तीन दिवस आधीच आरक्षण करा, अशा सूचनाही टँकर वितरक नागरिकांना देत आहेत.

राज्यभर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने एरवी एक दिवस पाणी आले नाही तर गळा काढणारे आता शांत झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेच्या वतीने तीन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या कपातीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून खासगी टँकरचालकांचे मात्र फावले आहे. नागरिकांची गरज पाहून खासगी टँकरवाले वाहत्या गंगेत हात धुऊन घेत असल्याचे दिसत आहे. अगदी पंधरवडय़ापर्यंत ३०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळणारा १० हजार लिटर पाण्याचा एक टँकर आता दोन ते अडीच हजार रुपयांना मिळू लागला आहे. एप्रिल महिना अर्धा संपत आला आहे. त्यात टँकरची मागणी वाढू लागली आहे. काही टँकरमालक एका टँकरचे तीन ते साडेतीन हजार रुपये आकारत आहेत. मे महिन्यात या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे टँकरमधील पाण्याचे वितरण करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. त्यातच टँकर वितरकांकडे वाहनांची संख्याही अपुरी असल्याने हे दर आणखी वाढू लागले आहेत. यामुळे ग्राहकांना दोन दिवस आधी बुकिंग करण्याची सूचना आम्ही देत असल्याचेही एका पाणी वितरकाने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून एका दिवसाला ३० ते ३५ किंवा त्यापेक्षा अधिक टँकरची मागणी होत असते. शहरात येणारे काही टँकर हे ठाणे, उल्हासनगर येथूनही येतात. ग्राहकांची दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असून त्यांना पाणी द्यायचे तरी कोठून, असा प्रश्न आमच्यासमोरही निर्माण झाला आहे, असे यापैकी काहींनी सांगितले. उल्हासनगर अथवा ठाणे येथील वितरकांशी बोलून त्यांच्याकडून पाणी खरेदी करून ग्राहकांना देतो. आम्हीच पाणी विकत घेत असल्याने आम्हाला ग्राहकांना ते चढय़ा दराने द्यावे लागत असल्याचे टँकर वितरकाने सांगितले.

nashik lok sabha nomination form last date marathi news
नाशिक: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले दोन दिवस
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका

पाणी कितपत सुरक्षित?
दरम्यान, टँकरचालकांकडून वितरित होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणारी कोणतीही ठोस यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नसल्याने या महाग पाण्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आठवडय़ातील दोन दिवस आम्हाला पालिकेकडून पाणी येते. त्यामुळे पाच दिवस पाणी पुरेल एवढा पाणीसाठा करायचा झाला तरी तो किती करणार, हा प्रश्न आहे. त्यातही पाणी आल्यावर त्याचा दाब कमी-जास्त झाल्याने काही मजल्यांवरील घरांना पाणीपुरवठा नीट होत नाही. अशा वेळी सोसायटीला टँकर मागवावा लागतो.
– अमोल पालव, रहिवासी