कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, व्दारली भागातील हरितपट्टा नष्ट करून उभारलेले प्रदुषणकारी जीन्सचे ३२ कारखाने आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांंनी अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने शनिवारी भुईसपाट केले. या कारखान्यांंमुळे परिसरात जलप्रदूषण, हवेतील प्रदूषण वाढल्याने परिसरातील नागरिक त्रस्त होते.
काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून उल्हासनगर शहरातील नागरी वस्तीमधील प्रदुषणकारी जीन्सचे कारखाने हटविण्यात आले. या कारखान्यांंमुळे प्रदूषण होत असल्याने परिसरातील नागरिकांंनी आपल्या भागात हे कारखाने पुन्हा सुरू होणार नाहीत याची काळजी घेतली होती. अलीकडे काही कारखाना चालक स्थानिकांना हाताशी धरून सरकारी, आरक्षित मोकळ्या, वन जमिनींचा ताबा घेऊन त्यावर शासनाच्या कोणत्याही परवानग्या न घेता जीन्सचे कारखाने सुरू करत आहेत.
हेही वाचा… रेल्वे पुलाच्या कामासाठी डोंबिवली फलाट एकवरील आरक्षण केंद्र कल्याण बाजुला
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, व्दारली भागात काही जीन्स कारखाना चालकांनी या भागातील सरकारी, खासगी जमिनीवरील हरितपट्टा नष्ट करून, या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होईल अशा पध्दतीेने ३२ जीन्स कारखान्यांची उभारणी केली होती. लोखंडी निवारे, सिमेंंट पत्र्यांचे आडोसे तयार करून त्यामध्ये चोरट्या पध्दतीने महावितरणची वीज वाहिनी घेऊन या जिन्स कारखान्यांची यंत्रणा सुरू करण्यात आली होती. या जीन्स कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदुषणाविषयी आय प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारीप्रमाणे मुंबरकर यांनी चिंचपाडा, व्दारली येथील जीन्स कारखान्यांची पाहणी केली. या कारखाने चालकांंनी शासन, पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आणि हे कारखाने बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, परिमंडळ उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या आदेशावरून पोलीस बंदोबस्तात मानवी आरोग्याला घातक असलेले प्रदुषणकारी ३२ कारखाने आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त मुंंबरकर यांनी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले. या कारखान्यांना चालकांनी महावितरणची चोरून वीज घेतली असल्याचे अनेक ठिकाणी तोडकाम पथकाला दिसले. कारवाई पूर्वी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
कारवाई सुरू होण्यापूर्वीच कारखाने चालक, कामगार घटनास्थळावरून पळून गेले होते. या कारवाईने प्रदुषणाने त्रस्त स्थानिक रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.
चिंचपाडा, व्दारली भागात काही वर्षापूर्वी हरितपट्टा नष्ट करून ३२ जीन्स कारखाने उभारण्यात आले होते. या कारखान्यांच्या प्रदुषणाने स्थानिक नागरिक खूप त्रस्त होते. या कारखान्यांविषयी तक्रारी वाढल्या होत्या. हे कारखाने बेकायदा असल्याने ते जमीनदोस्त केले. या कारखान्यांना अधिकृत, चोरून वीज मिळणार नाही याची काळजी महावितरणने घेणे गरजेचे आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.