जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. नवीन गणवेश, नवीन दफ्तर, वह्या पुस्तके कधी एकदा आपल्याला मिळतात याची मुलांना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली असते. मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मात्र हा आनंद लुटण्याचे भाग्य लाभलेले नाही. शाळा सुरू होऊन जवळपास दोन आठवडे उलटत आले तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. मीरा-भाईंदर महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या ३५ शाळा आहेत. यात तब्बल पावणे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांमधून शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील असल्याने महापालिका त्यांना पाठय़पुस्तके, वह्य़ा ,गणवेश, दफ्तर, पाण्याची बाटली मोफत देत असते. यातील पाठय़पुस्तके थेट शासनाकडून येत असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू होतानाच त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला आहे. उर्वरित शैक्षणिक साहित्य मात्र प्रशासन निविदा काढून कंत्राटदारामार्फत मागवून मग ते विद्यार्थ्यांना देत असते. यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. मात्र शाळा १५ जूनला सुरू झाल्यानंतरही हे शैक्षणिक साहित्य मागवले गेलेले नाही.
पालिकेच्या शिक्षण विभागाने आवश्यक सर्व साहित्याची यादी तयार ठेवली आहे. परंतु शैक्षणिक साहित्य खरेदीची निविदा काढण्यासाठी अद्याप महासभेकडून आर्थिक व प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने निविदा प्रक्रियाच सुरू झालेली नाही. त्यामुळे महासभेच्या मान्यतेनंतर निविदेचे सोपस्कार पार पाडून विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळण्यासाठी किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पाठय़पुस्तके मिळालेली असली, तरी विद्यार्थ्यांना वह्य़ांशिवाय अभ्यास पार पाडावा लागणार आहे. एप्रिल महिन्यातल्या महासभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरीचा विषय घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होताच हे साहित्य देणे शक्य आहे. परंतु विद्यार्थ्यांना साहित्य वेळेवर मिळत नाही. याची पुनारावृत्ती दरवर्षीप्रमाण यंदाही झाली आहे.
एक महिना लागणार?
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी महासभा होऊ शकली नाही. त्यामुळे या प्रक्रियेस थोडासा विलंब झाला आहे. मात्र येत्या महासभेत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी मिळून विद्यार्थ्यांना महिन्याभरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आधीच महापालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक दर्जाविषयी ओरड होत असते. त्यातच आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्यदेखील विद्यार्थ्यांना वेळेवर दिले जात नसल्याने महापालिकेवर टीका होत आहे.