महावितरणकडून पथदिव्यांच्या वीजजोडण्या खंडित
सामान्य माणसाने वीजबिल भरले नाही तर त्यांच्या वीजजोडण्या खंडित केल्या जातात, मात्र वसई-विरारमध्ये तर महापालिकेनेच वीजबिल भरले नसल्याचे दिसून आले आहे. सहा हजारांची वीजबिलांची थकबाकी असल्याने महावितरणने पालिकेच्या पाच प्रभागांतील वीजजोडण्या खंडित केल्या. मात्र त्यानंतर पालिकेला जाग आली आणि त्यांनी वीजबिल भरले, मात्र पथदिवे बंद झाल्याने मंगळवारी रस्ते अंधारात बुडाले आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
रस्त्यावर पथदिवे लावणे ही महापालिकेची प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाची सेवा आहे. वसई पूर्वेच्या पाच प्रभागातील नागरिकांना मंगळवारची रात्र अंधारात काढावी लागली. महापालिकेन वीजबिलाचा भरणा न केल्याने महावितरणाने वसई पूर्वेच्या प्रभाग क्रमांक ८९, ९०, ९१, १०५ आणि ११५ मधील पथदिव्यांच्या वीजजोडण्या खंडित केल्या. अवघे ६ हजार ३७० रुपयांचे बिल महापालिकेने न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
ज्या पाच प्रभागातील पथदिवे बंद होते, तो प्रभाग वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात येतो. कामण, कोल्ही चिंचोटी. देवदळ, बापाणे ससूनवघर अर्नाळा कोलांडेद आदी गावांचा त्यात समावेश होतो. मंगळवारी रात्री रस्त्यावर पूर्ण अंधार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्री कामावरून परतलेल्या नागरिकांना तसेच नवरात्रोत्वावरून परत येणाऱ्या महिला आणि मुलांची यामुळे मोठी गैरसोय झाली होती. आमचा भाग हा ग्रामीण आहे. येथे हिंस्त्र श्वापदे, सरपटणारे प्राणी यांचा वावर असतो. मंगळवारी रात्री पथदिवे बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यांना जीव मुठीत धरून घरी यावे लागले, असे कामण गावाची माजी सरपंच दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.
आम्ही वारंवार महापालिकेला नोटीसा बजावल्या होत्या. मात्र तीन मीटरची ६ हजार ३७० रुपयांची थकबाकी न भरल्याने आम्ही तात्पुरती वीज जोडणी (टीडी) तोडली होती, तसेच ९८ हजारांची वीज थकबाकी न भरल्याने एक मीटर कायमस्वरूपी खंडित केला आहे. पालिकेची एकूण थकबाकी १ लाख १० हजारांची होती. मात्र बुधवारी महापालिकेने ६ हजार रुपयांची थकबाकी भरल्याननंतर वीजपुरवठा पूर्ववत केला.
– बी. एस. साळगावकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण
ग्रामपंचायत असताना एकदाही वीजजोडणी खंडित झाली नव्हती, परंतु पालिका आल्यापासून हे प्रकार होऊ लागले आहेत. पाच प्रभागात विद्युत विभागासाठी महापालिकेने केवळ तीन कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे अनेक पथदिवे नादुरूस्त असतात त्यांची देखभाल दुरूस्ती होत नाही.
– प्रिती म्हात्रे, नगरसेविका