कल्याण-डोंबिवली शहरातील मोकळे भूखंड, सरकारी तसेच वनजमिनी लाटून झाल्यानंतर भूमाफियांनी आपला मोर्चा विकास आराखडय़ातील रस्त्यांकडे वळवला आहे. विकास आराखडय़ात रस्त्यांसाठी सोडलेल्या जागा बळकावून तेथे गाळे बांधण्याचे उद्योग सध्या जोरात सुरू आहेत. टिटवाळ्यापासून कल्याण- डोंबिवली शहरातील आठ ते नऊ विकास आराखडय़ातील रस्त्यांवर अलीकडे अतिक्रमणे करण्यात आली असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.
विकास आराखडय़ातील ४० ते ५० फूट रुंदीच्या रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत महापालिकेचा नगररचना विभाग, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, तहसीलदारांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. शहरातील नेहमीच्या रस्त्यांवरील वाहतूक वाढल्याने भविष्यात
विकास आराखडय़ातील रस्ते
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या रस्त्यांच्या कामासाठी पालिकेने प्रस्तावही तयार केले असून या भागात वसाहती वाढू लागल्यानंतर त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. मात्र, आता ते रस्ते भूमाफियांनी घश्यात घालण्यास सुरुवात केली आहे.  

विळख्यातील रस्ते
*टिटवाळ्यातील राधानगर भागातील साईबाबा मंदिर ते द्वारकामाई संकुलापर्यंतचा ५० ते ६० फूट विकास आराखडय़ातील रस्ता एका जमीन मालकाने १५ फूट झाडे, तारेचे कुंपण करून व्यापून टाकला आहे.
*कल्याण पूर्वमधील दुर्गानगरमधील रस्त्यामध्ये दुमजली इमारत उभारण्यात आली आहे.
*डोंबिवलीतील गांधीनगर मधील शनिमंदिर ते स्वामी समर्थ मठापर्यंतच्या रस्त्यात बेकायदा बांधकामे, इमारती उभारण्यात आल्या आहेत.
*गणेशनगरमध्ये विकास आराखडय़ातील रस्ता हडप करण्यात आला आहे.
*कांचनगाव परिसरातील एका शैक्षणिक संकुलाच्या भागातील साठ फुटी रस्ता एका शिक्षण संस्थेने अतिक्रमण करून फुलबागेच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न केला असल्याच्या रहिवाशांची तक्रारी आहेत.
*भोपर येथे एका जमीन मालकाच्या खासगी जमिनीवर बेकायदा प्रार्थनास्थळ बांधण्यात येत आहे.