आरक्षित भूखंडावर शेकडो अनधिकृत बांधकामे

लोकसत्ता, प्रतिनिधी

विरार : शहरातील आरक्षित भूखंड आधीच भूमाफियांनी गिळंकृत केले असताना आता पर्यावरणालासुद्धा हानी पोहचवत आहेत. शहरातील आरक्षित भूखंडाबरोबर आता पर्यावरण संरक्षित  क्षेत्रसुद्धा भूमाफियांनी गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. शासनाकडून आरक्षित केलेल्या पर्यावरण संरक्षित  क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. असे असतानाही स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची खंत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

वसईचे पर्यावरण समतोल राखण्यासाठी शासनाने वसईतील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानुसार या गावात तसेच गावालगत एक किलोमीटरच्या आसपास बांधकामांना परवानगी नाकारली होती. या संदर्भात  मुंबई उच्च न्यायालयात एप्रील २०१९ रोजी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी करता  न्यायालयाने आयुक्तांना आदेश दिले होते की, सर्वेक्षण करून या परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी. पण पालिकेने या देशाने कोणतेही पालन केले नाही. उलट पक्षी या परिसरात मागील वर्षभरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली. आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

शासनाने वसई विरार परिसरातील २८ गावे ही पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत त्यात त्यात तुंगारेश्वर, पारोळ, कणेर, पोमण, सिरसाड, पेल्हार, वालीव, कामन, पोमन, कोल्ही, देवदल, चिंचोटी, चन्द्रपाडा, टिवरी, राजीवली, सातीवली, खैरपाडा, कनेर, मांडवी आदी गावांचा समावेश आहे. पण मागील काही महिन्यांत या गावात मोठय़ा प्रमाणात भूमाफियांनी कब्जा करत हजारो अनधिकृत बांधकामे केली आहेत.

अनेक ठिकाणी तिवरांच्या झाडांची कत्तल केली तर अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले, तलाव, डोंगर, खाडी गायब होऊन त्या ठिकाणी बांधकामे उभी राहिली आहेत. अनेक विकसकांनी तर औद्योगिक वसाहती स्थापन केल्या असून कारखान्यातील रसायन युक्त पाणी नैसगिक जलस्रोत सोडले आहे. यामुळे  या परिसरातील जलस्त्रोत नष्ट झाले आहेत.

प्रभाग एफ आणि जीमधील उमर कंपाउंड, जाबरपाडा, वनोटापाडा, रिचर्ड कंपाउंड, खैरपाडा, तुग्नारेश्वर, चिंचोटी, कामन, भोयदापाडा, राजीवली, राजप्रभा,धुमालनगर या परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. खुलेआम वृक्षांची कत्तल करत भूमाफिया पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. पण महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मागील पावसाळ्यात याच परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तरीसुद्धा महापालिका या भूमाफियांवर कोणतीही कारवाई करत नाही.

प्रभाग समिती सहायक आयुक्तांना या संदर्भात आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण संरक्षित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल.
-आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका