खेळाच्या मैदानात जत्रेपासून कचऱ्याचे साम्राज्य
शहरातील मैदानांचा खेळांव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येत असून नियोजनबद्ध विकासाची शेखी मिरविणारे घोडबंदर रोड परिसरातील नवे ठाणेही त्याला अपवाद नाही. कावेसर येथील खेळांसाठी राखीव असलेल्या मैदान त्याचे ठळक उदाहरण असून चारही बाजूंनी विविध कारणांनी होत असलेल्या आक्रमणांमुळे हे मैदान आता खेळण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. अतिक्रमणांचे हे आक्रमण असेच सुरू राहिले तर हे मैदान होत्याचे नव्हते व्हायला फारसा वेळ लागणार नाही, अशी भीती या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
कावेसर मैदानाची संरक्षक भिंत तोडून आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामाचे डेब्रिज, कचरा आणून टाकला जात आहे. उर्वरित जागेत बाराही महिने विविध प्रकारचे कार्यक्रम मैदानात सुरू असतात, आनंद मेळे भरविले जातात. त्यानिमित्त येणारी कुटुंबे मैदानातच चुली मांडून स्वयंपाक करतात. उरलेले अन्न, कचरा मैदानात टाकला जातो. विविध कार्यक्रमांसाठी टाकण्यात आलेल्या मांडवांसाठी मैदानात ठिकठिकाणी खड्डे खणले जातात. त्याचे खिळे मैदानात इस्ततत: पडलेले असतात. त्यामुळे मैदानातून चालणेही धोकादायक झाले आहे. मुळात खेळासाठी राखीव असलेले मैदान अन्य कोणत्याही कारणांसाठी उपलब्ध करून देणेच चुकीचे आहे; मात्र उत्पन्नासाठी पालिका प्रशासन मैदान भाडय़ाने देत असेल तर संबंधित संस्थांना तिथे स्वच्छता राखण्याची अट घालायला हवी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मैदानातील हा खेळखंडोबा कमी होता म्हणून की काय आता मैदानाच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला असलेले गॅरेज आणि सव्र्हिस सेंटर्स त्यांचे डिझेल आणि ऑईल मिश्रित सांडपाणी मैदानात सोडून देत आहेत. गाडय़ा दुरुस्तीनंतर उरलेले भंगार सामान मैदानातील झाडाखाली साठून ठेवले आहे. यासंदर्भात ‘घोडबंदर रोड कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् असोसिएशन’ने आयुक्तांना निवेदन दिले असून अतिक्रमणांच्या विळख्यातून मैदान वाचविण्याचे आवाहन रहिवाशांनी केले आहे.
संघटनेच्या वतीने आम्ही लोकसहभागातून घोडबंदर परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, क्रीडा उपक्रम राबवितो. मात्र कावेसर येथील मैदानातील अतिक्रमण चिंताजनक आहे. महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी आमची अपेक्षा आहे.
-डॉ. वामन काळे, अध्यक्ष,
घोडबंदर रोड कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् असोसिएशन