college-kattaठाणे : आजच्या अ‍ॅण्ड्रॉइडच्या जगात मैत्री फक्त एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप, इंटरनेट, ई-मेल या पुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यातून फक्त ‘फॉरवर्डिग’ होते. त्याऐवजी अशा माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगला विचारमंच मिळावा व आपल्या भावभावना शब्दांतून, कवितांमधून व्यक्त करता याव्यात, असे प्रयत्न महाविद्यालयीन पातळीवर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बांदोडकर महाविद्यालयाचे साहित्य सहवास व भाषा मंडळाचे समन्वयक सुधीर भोसले यांनी केले.
बांदोडकर महाविद्यालयाच्या साहित्य सहवास आणि भाषा मंडळाच्या वतीने ‘मैत्री’ या कार्यक्रमाचे आयोजन पतंजली सभागृहात करण्यात आले होते. मैत्री दिनाच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांना खऱ्या मैत्रीचा अर्थ लक्षात यावा, याविषयी त्यांच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात, म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पदवी महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. ग्लोबल व्हिलेज आणि विश्वबंधुत्व या संकल्पनेचा धागा पकडून मैत्री ही कुणीही, कुणाशीही करू शकतो. मैत्रीची भावना निखळ व निरागस असू शकते. तिला कोणत्याही जाती, धर्म, प्रांत, भाषा, देश, सीमेचे बंधन नसते हा विचार विद्यार्थ्यांनी कविता, चारोळी, शेरोशायरी व विचारांतून मांडला. ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या महाजालात मैत्रीसारखी हळुवार भावना लोप पावत चालली आहे. फेसबुकवर ५०० मित्र असणाऱ्याला प्रत्यक्षात मात्र जीवाभावाचा एकही मित्र नसतो, अशी शोकांतिकाही विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांतून मांडली. या कार्यक्रमासाठी बांदोडकर महाविद्यालय, मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग व जागर जाणिवांचा अभियान या विभागाची मोलाची साथ होती.

अर्थसंकल्पाचे विश्लेषण
नवीन कर प्रणाली, आर्थिक दृष्टिकोन, नवीन तरतुदी आणि त्याचे औद्योगिक क्षेत्रावर होणारे परिणाम इत्यादी विषयांवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित डॉ. वा. ना. बेडेकर व्यवस्थापन संस्था या महाविद्यालयाच्या वतीने शनिवार, ७ मार्च सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१५’ या विषयावर विश्लेषण आणि चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला लेखापाल डॉ. विष्णू कान्हेरे, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, डॉ. वा. ना. बेडेकर व्यवस्थापन अभ्यास संस्थेचे संचालक डॉ. नितीन जोशी, तसेच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, वित्त व्यवस्थापक, वित्तीय सल्लागार, वित्त विश्लेषक, लेखापाल, शिक्षण क्षेत्रातील संशोधक असे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

‘रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती महत्त्वाची’
उल्हासनगर : रोजगार मिळवण्यापेक्षा आपण रोजगार निर्मिती कशी करू शकतो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे मत एम.आय.एम. इन्स्टिटटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्च्या संचालिका डॉ. स्वाती साबळे यांनी व्यक्त केले.
 महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘आर्श-रिचिंग द अल्टिमेट’ या उद्योजक परिषदेत त्या बोलत होत्या. भारताला एक विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासाठी उद्योजकतेवर भर देणे फार महत्त्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. परिषदेत मुंबईतील विविध महाविद्यालयांतील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आपल्या स्वप्नांना बळकटी देऊन जीवनातील यशाचे शिखर कसे गाठता येऊ शकते. ध्येय गाठण्यासाठी जीवनात आलेल्या अडचणींवर मात कशी करावी आणि यशस्वी कसे बनावे हा कानमंत्र या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाला. यावेळी अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत उपलब्ध असणाऱ्या संधींविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला कमानी टय़ुब्स कंपनीच्या अध्यक्ष पद्मश्री कल्पना सरोज या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते व सिद्धकला इंजिनीयरिंगचे संचालक संजय गावकर, नवजीवन बॅंकेचे अध्यक्ष सीतलदास हरचंदानी, विश्वनाथ पनवेलकर, राहुल पनवेलकर, लुकवेल सलूनकडून सुनीता पवार, क्वालिटीचे संचालक प्रसाद पालीवाल, एस.जी. सव्‍‌र्हिसेसचे संचालक प्रसाद गोळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मिलाप’ महोत्सव : एम.आय.एम. महाविद्यालयाचा ‘मिलाप’ हा महोत्सव नुकताच महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या महोत्सवात के. जे. सोमय्या महाविद्यालय, जोशी-बेडेकर महाविद्यालय, श्रीमती सी.एच.एम. महाविद्यालय, नारी गुरसहानी लॉ कॉलेज अशा अनेक मुंबई व उल्हासनगरमधील बडय़ा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. दोन दिवसीय मिलापमध्ये ३१ स्पर्धाचा समावेश होता. मॉक स्टॉक, बिझनेस प्लॅन, बिझनेस क्वीज, वाद-विवाद, केस स्टडी, नृत्य, सच का सामना, बिग बॉस, रांगोळी, एम.आय.एम. रोडीज, कॅरम, बुद्धिबळ, मास्टर शेफ, किक्रेट अशा अनेक स्पर्धाचा समावेश होता.

गोवेली महाविद्यालयात ग्रंथदिंडी
किन्नरी जाधव
जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित गोवेली महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढून आगळ्या वेगळ्या पद्धतीने मराठी राज्यभाषा दिन साजरा केला. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या ग्रंथांना पालखीत मिरवत महाविद्यालयातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले होते. गोवेली परिसरात ग्रंथदिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी भजन, भारुड तसेच फुगडी यांसारख्या पारंपरिक खेळाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आणि प्राचार्य डॉ. यू. बी. जंगम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सृजन या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. दर महिन्यात विद्यार्थी हे भित्तिपत्रक तयार करत असतात. कुसुमाग्रजांचा जीवन परिचय आणि मराठी भाषेचे महत्त्व दर्शवणारे भित्तिपत्रकही विद्यार्थ्यांनी तयार केले होते. याचवेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांना ५०० विद्यार्थ्यांच्या सह्य़ांचे निवेदन पाठवण्यात आले. मराठी विभागप्रमुख प्रा. हरेंद्र सोष्टे, प्रा. प्रशांत पाटकर तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

‘कलाविष्कार’ मराठी महोत्सव थाटात
किन्नरी जाधव
नेरळच्या मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधून आंतर महाविद्यालयीन मराठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महोत्सवात काव्यवाचन, वक्तृत्व, गीतगायन, नृत्य अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक जाणिवेच्या कविता सादर करताना विद्यार्थ्यांनी त्याची गरज पटवून दिली. या स्पर्धेत गोवेली महाविद्यालयाच्या राहुल ठुमणे याने प्रथम क्रमांक, योगिता दळवी द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक टिपणीस महाविद्यालयाच्या अमृता राणे हिने पटकवला. गीत गायन स्पर्धेत भावगीत सादर करत गोवेली महाविद्यालयाच्या गणेश विशे याने प्रथम, टिपणीस महाविद्यालयाच्या सुषमा दुर्गे द्वितीय, तर तृतीय क्रमांक स्वाती खुटेरे हिने पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत ‘राजमाता : जिजाऊ एक आदर्श माता’ आणि ‘मला अपेक्षित असलेला अभ्यासक्रम’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. या स्पर्धेत गोवेली महाविद्यालयाच्या राहुल ठुमणे याने  विजेतेपद पटकावले. टाटा इन्स्टिटय़ुट मुंबईचा अमोल मोरे द्वितीय, तर टिपणीस महविद्यालयाच्या अमृता राणे हिने तिसरा क्रमांक मिळवला. नृत्य स्पर्धेत टिपणीस महाविद्यालयाच्या नेहा घाटे हिने प्रथम क्रमांक पटकवला, तर गोवेली महाविद्यालयाच्या स्वाती खुटेरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

‘साहित्यरत्न’चे प्रकाशन
ठाणे : मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळातर्फे हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकच्या जगात अधिक रममाण होणाऱ्या युवा पिढीला साहित्याची गोडी लागावी, यासाठी महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना व्यावहारिक भाषेचे ज्ञान अवगत करण्याचा सल्ला त्यांनी दिला. वाचन करून ज्ञानार्जन करणे हा एक व्यायाम आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी सांगितले. मराठी वाङ्मय मंडळातर्फे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिकांच्या माहितीचे संकलन ‘साहित्यरत्ने’ या हस्तलिखितात केले गेले आहे. या प्रकल्पात मराठी तसेच अमराठी विद्यार्थी सहभागी झाले होते.

अमराठी प्राध्यापकांचे मराठी कविता संमेलन
मानसी जंगम  
‘मराठी भाषा दिन’ मराठी भाषिकांसाठी गौरवाचा दिवस असून या दिवसाचे महत्त्व व मराठी भाषेचे माधुर्य सर्व भाषिकांना कळावे यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयात अमराठी प्राध्यापकांसाठी मराठी कविता संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात महाविद्यालयातील अमराठी प्राध्यापकांनी मराठी कविता सदर करून मराठी भाषेबद्दल आपला आदर व्यक्त केला. शिवाय उपस्थितांची दाद मिळवली.
महाविद्यालयाच्या प्रा. सुजा अब्राहम, डॉ. इंद्रायणी रॉय, प्रा. लीना आजीस कुरूप, प्रा. क्षिप्रा राऊतराय, प्रा. बिनिता नायर, प्रा. झरना तोलानी, प्रा. नम्रता श्रीवास्तव आणि प्रा. सीतालक्ष्मी यांनी कुसुमाग्रजांच्या प्रवास, कणा, प्रतीक्षा आणि स्वर या कवितांचे वाचन केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे यांनी ‘जागतिकीकरण, युनिकोड आणि मराठी’ याविषयी माहितीपर भाषण केले. ‘मराठी बोलीभाषांचा जागर करणे आवश्यक आहे’ असे मत प्रा. दामोदर मोरे यांनी व्यक्त केले. १२व्या, १३व्या व १७व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप सांगितले. प्रा. जयश्री सिंग यांनी ‘मेरी मराठी मैया’ या प्रा. दामोदर मोरे लिखित कवितेचा अनुवाद सादर केला. विद्यार्थ्यांनीदेखील या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला. शिवम पाटील व श्रीकांत घाणेकर या अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीचा वापर करत लिहिलेल्या मराठी कविता सादर केल्या. यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शकुंतला सिंग यांनी ‘मराठी भाषा अभिजात व्हावी यासाठी खारीचा वाटा सर्वानी उचलावा’, असे आवाहन केले. पंकज चव्हाण व प्रथमेश डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सावरकरांच्या पुस्तकांचे बांदोडकर महाविद्यालयात प्रदर्शन
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयामध्ये सावरकरांनी लिहिलेल्या काळे पाणी, माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने, शत्रूंच्या आठवणी, विज्ञान आणि निबंध, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, गांधी आणि गोंधळ, हिंदुत्व, हिंदू राष्ट्रदर्शन अशा दुर्मीळ पुस्तकांचे, कादंबऱ्या ुव आत्मचरित्रांचे प्रदर्शन भरवले गेले होते. तसेच सावरकरांच्या निवडक कवितांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. सावरकरांची लेखणी कणखर होती. त्यांनी लिहिलेले शब्द मनावर कमालीचे परिणाम करणारे आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने सावरकरांचे लेखन एकदा तरी वाचावे, असा सल्ला प्राध्यापकांनी  दिला.  

के. बी. महाविद्यालयात वकृत्व स्पर्धा
ठाणे : ठाण्यातील के. बी. महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे ‘मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भाषणातून मातृभाषेविषयी असणारी आस्था व ओढ स्पष्ट झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वाङ्मय मंडळाच्या सदस्या प्रा. मंजूषा कुलकर्णी यांनी केले. तसेच या दिनानिमित्त प्रा. जगदीश मगर व प्रा. वैशाली गरकल आणि प्राचार्या डॉ. रेणु त्रिवेदी यांनीही आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. मराठी व अमराठी भाषिक शिक्षक व विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता.

‘अस्मिता’ हस्तलिखिताचे प्रकाशन
बदलापूर : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून येथील आदर्श महाविद्यालयात संवाद – तंत्र आणि कौशल्ये या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाच्या वतीने अस्मिता या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. ‘अस्मिता’ अंकाचे प्रकाशन आठ वर्षांपासून करण्यात येत असून मराठी भाषा व वाङ्मय मंडळातर्फे ते प्रकाशित करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले लेखक व कांदबरीकार, नाटककार प्रा. प्रदीप ढवळ यांनी मराठी भाषा, भाषिकांसाठी व वाचकांसाठी केलेल्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देत भाषेचे महत्त्व सांगितले. यावेळी दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत निवेदिका दीपाली केळकर, निवेदक श्रीराम केळकर, श्यामकांत अत्रे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दफ्तरदार आदींनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

बिर्ला महाविद्यालयात ‘ज्ञानपीठ चतुष्टय़’  

कल्याण : बिर्ला महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त ‘ज्ञानपीठ चतुष्टय़’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज व भालचंद्र नेमाडे यांच्या कविता वाचनाचा व सादरीकरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापकांबरोबरच मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण देवरे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम सादर झाला, तर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या स्वप्ना समेळ यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. लेझीम पथकाच्या साथीने महाविद्यालयाच्या परिसरात ग्रंथदिंडी फिरवण्यात आली.  

लोककलेतून मराठीचा जागर

ठाणे : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून बाळकृष्ण नाईक बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे सांस्कृतिक नृत्याविष्काराचे व वैचारिक, भाषिक संवादाचे आयोजन केले होते. यावेळी प्रसिद्ध सूत्रसंचालिका व निवेदिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक मिलिंद भागवत उपस्थित होते. त्यांनी यावेळी मराठी भाषेचे महत्त्व व त्यांच्या क्षेत्रातील गमतीजमती विद्यार्थ्यांना सांगितल्या. भाषा, संस्कृती व अस्मिता संवर्धन हे आपले कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडलेच पाहिजे, असे आवाहन मराठी विभागप्रमुख प्रा. बिपीन धुमाळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
संकलन : श्रीकांत सावंत