दुकानदाराने दाखविलेल्या सतर्कतेमुळे दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वापरून दुकानातून सामान खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अब्दुल रेहमान शेख (२०) असे त्याचे नाव आहे.

दोन दुकानात दोन हजार रुपयांच्या नोटा यशस्वीरीत्या चालवल्यानंतर भाईंदर पश्चिम येथील एका वाणसामानाच्या दुकानात शेख गेला. मात्र दुकानदाराने त्याने दिलेली दोन हजारांची नोट निरखून पाहिली असता ती बनावट असल्याचे त्याच्या लक्षात आले. दुकानदाराने भाईंदर पोलिसांना त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याच्याकडे दोन हजारांच्या आणखी आठ खोटय़ा नोटा आढळून आल्या. वसईच्या वालीव भागात राहणाऱ्या शेख याने आपण मूळचा पश्चिम बंगाल येथील असल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र पोलीस त्याच्या भारतीय नागरिकत्वाची खात्री करीत आहेत. शेख याच्या वालीव येथील घरावर पोलिसांनी छापा घातला, परंतु घरात आणखी नोटा सापडल्या नाहीत. या नोटा त्याने कशा मिळविल्या याचा शोध सुरू असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.