भारतीय उपखंडात जसे विविध जाती-धर्माचे, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, त्याचप्रमाणे येथील खाद्यपदार्थामध्येही कमालीचे वैविध्य आढळते. विशेषत: सण आणि उत्सव काळात खास पदार्थ बनविण्याची भारतात परंपरा आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण. या सणानिमित्त अगदी घरोघरी चकल्या, लाडू, करंज्या आदी जिन्नस बनविले जातात, किंवा बाहेर ऑर्डर देऊन बनवून घेतले जातात. त्याचप्रमाणे ओनम आणि पोंगलनिमित्त पायसम, रमझान ईदनिमित्त खीर कुर्मा, नान चाप, शामी कबाब हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात किंवा एकमेकांना त्याची दावत म्हणजेच पार्टी दिली जाते.
सध्या रमझानचा महिना सुरू असून त्यानिमित्त ठिकठिकाणी संध्याकाळी खाऊ जत्रा भरतात. ठाण्यातील राबोडी नाक्यावरील ‘शमीम सिख कबाब अॅँण्ड तवा सेंटर’मध्ये पारंपरिक मुस्लीम पद्धतीचे पदार्थ मिळतात. चिकन आणि मटण रोल, रमझान स्पेशल नान चाप, सिख कबाब अशा अनेक खमंग चिकन आणि मटणाच्या वैशिष्टय़पूर्ण डिश हे या तवा सेंटरचे वैशिष्टय़ आहे. संपूर्ण ठाणे शहरात या चवीची कीर्ती पोहोचली आहे.
प्राचीन काळी माणसं सळीवर प्राण्यांचे मांस लावून ते आगीवर भाजून खात असत. कालांतराने त्यास कबाब हे अरेबिक नाव प्राप्त झाले. पूर्वी ठाण्यामधील चिकन आणि मटणप्रेमींना चिकन आणि मटणापासून बनविलेले पदार्थ खाण्यासाठी मुंब्रा, मसजिद बंदर किंवा अरेबिक हॉटेलामध्ये जावे लागायचे. ठाण्यातील ही उणीव शमीम कुरेशी यांनी दूर केली. २५ वर्षांपूर्वी त्यांनी चिकन मटणचे वैविध्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असलेला कॉर्नर सुरू केला. आता त्यांचा मुलगा तन्वीर कुरेशी कॉर्नरची जबाबदारी सांभाळतो आहे.
शमीम सिख कबाब अॅण्ड तवा सेंटरमध्ये आपल्याला चिकन आणि मटण रोल, चिकन आणि मटण मुघलाई पराठा, रमझान स्पेशल नान चाप, खिमा फ्राय, बोटी फ्राय, शामी कबाब असे तवा पदार्थ आणि सिख कबाब, बोटी टिक्का, लिव्हर टिक्का अशा चिकन आणि मटणसंबंधीच्या ११ पदार्थाची चव चाखायला मिळते. चिकन किंवा मटण रोलमध्ये सर्वप्रथम चिकन/ मटणचा बारीक खिमा करून त्यात झायखा मसाला, थोडं लाल तिखट टाकून ते मिश्रण तव्यावर एकसंध केलं जातं. त्यानंतर मैद्याची पोळी (रोटी) तयार करून त्यावर ऑम्लेटचा पातळसा थर ठेवला जातो. त्यात तयार केलेलं चिकन/ मटणचे मिश्रण टाकून एक रोल तयार केला जातो. तो रोल तव्यावर फ्राय करून चिकन किंवा मटण रोल तयार केला जातो. चिकन किंवा मटण मुघलाई पराठा हासुद्धा चिकन रोलच्या पद्धतीनेच तयार केला जातो. मात्र या पराठय़ामध्ये मैद्याची रोटी रोल न करता ती चौकोनी आकारामध्ये कापली जाते आणि तो चौकोनी पराठा तव्यावर भाजून चिकन-मटण मोघलाई पराठा तयार केला जातो. चिकन-मटण रोल किंवा पराठा यांबरोबरच येथे असलेले खिमा फ्राय, बोटी म्हणजेच भूना फ्राय, शामी कबाब म्हणजे खाद्यप्रेमींसाठी मेजवानीच. मटण खिमा हा येथील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण पदार्थ. सर्वप्रथम कढईतील गरम तेलात पाच मिनिटे कांदा परतून घेतला जातो. गरम झालेल्या कांद्यामध्ये मटण खिमा टाकून ते मिश्रण ३ ते ४ मिनिटे शिजवून घेतलं जातं. त्यानंतर त्यात मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, झायखा मसाला, गरममसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि चवीप्रमाणे दही टाकून ते मिश्रण एकसंध होईपर्यंत ढवळून मटण खिमा फ्राय तयार केला जातो. मटण भूना फ्राय (बोटी फ्राय) हा मटणाच्या उभ्या, परंतु गोटीसारख्या लहान कापलेल्या तुकडय़ांचा वापर करून खिमा फ्रायच्या पद्धतीप्रमाणेच तयार केला जातो. मात्र येथील सर्वात लोकप्रिय डिश म्हणजे शामी कबाब. सर्वप्रथम मटण खिमा आणि डाळ एकत्रित करून त्यात झायखा मसाला टाकून एक मिश्रण तयार केल जातं. ते मिश्रण गोलाकार करून फेटलेल्या अंडय़ामध्ये लपेटलं जातं. त्यानंतर गोलाकार मिश्रणास तव्यावर फ्राय करून शामी कबाब तयार केला जातो.
पराठा, खिमा अशा फास्ट फूड कम जेवण असलेल्या पदार्थाबरोबरच आपल्याला येथे सिख कबाब, बोटी आणि लिव्हर कबाब अशा शेगडीवर भाजल्या जाणाऱ्या स्टार्टर्सचीसुद्धा चव चाखायला मिळते. येथील सिख कबाब हा खिमा, कांदा, गरममसाला, झायखा मसाला, कोथिंबीर यांचे एकत्रित मिश्रण सळीमध्ये लावून ते एकसंध करण्यासाठी ठेवलं जात. एकसंध मिश्रण शेगडीवर भाजून स्वादिष्ट सिख कबाब तयार केले जातात. वैशिष्टय़पूर्ण असा बोटी आणि लिव्हर टिक्का हा सर्वप्रथम मिरची, लसूण, झायखा मसाला, कोथिंबीर हे एका भांडय़ात कुटून घेतले जातात. त्यानंतर वाफवलेली बोटी-लिव्हर कुटलेल्या मसाल्यात मिसळवून ते मिश्रण सळीमध्ये लावून एकसंध करण्यासाठी ठेवलं जातं. एकसंध मिश्रण शेगडीवर भाजून बोटी आणि लिव्हर टिक्का तयार केला जातो.
शमीम सिख कबाब अॅण्ड तवा सेंटरचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारे रमझान स्पेशल नान चाप. खिमा, बोटी फ्राय, बटाटा यांपासून नान चाप तयार केले जातात. सर्वप्रथम तव्यावर खिमा, बटाटा, बोटी फ्राय यांचं मिश्रण करून त्यात झायखा मसाला टाकला जातो आणि ते मिश्रण एकसंध करून घेतले जाते. त्यानंतर मैद्याची पोळी (रोटी ) करून त्यावर ते मिश्रण ठेवलं जातं. शेवटी रोटीचं सँडविच तयार करून नावीन्यपूर्ण असा नान चाप तयार केला जातो.