नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सुरू केलेल्या एफआयआर या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे गेल्या दहा दिवसांत तब्बल तेरा हजारांहून अधिक जणांनी मीरा-भाईंदर पोलिसांशी संपर्क साधला. परंतु महत्त्वाची बाब अशी की, यातील केवळ नव्वदच्या आसपास प्रकरणांतच पोलिसांना सत्यता आढळून आली. उर्वरित प्रकरणात एक तर तक्रारदारांनी उत्सुकतेपोटी अॅप्लिकेशनमधील हेल्प हे बटण दाबले होते किंवा तक्रारदार हे मीरा-भाईंदर क्षेत्राबाहेरचे असल्याचे आढळून आले.
नागरिकांना स्वत:च्या सुरक्षिततेला धोका असल्याचे आढळून आल्यास त्यांना त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी पोलीस विभागाने एफआयआर हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. हे अॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्यात स्वत:ची नोंदणी करायची असते. संकटसमयी अॅप्लिकेशनमधील हेल्प हे बटन दाबले की स्थानिक पोलिसांना तक्रारदार व्यक्तीचा ठावठिकाणा त्याचा मोबाइल क्रमांक लगेचच उपलब्ध होतो व ते त्या व्यक्तीशी संपर्क साधतात. आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी हे अॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच लाखो लोकांनी या अॅप्लिकेशनला लाइकही केले आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल तेरा हजारच्या आसपास लोकांनी हेल्प बटन दाबून पोलिसांशी संपर्क साधला. मात्र यातील केवळ नव्वदच्या आसपास प्रकरणातच तक्रारदार हे मीरा-भाईंदरशी संबंधित होते. छेडाछेडी, घरगुती विवाद, रहिवासी सोसायटय़ांमधील आपसातले वाद असे या तक्रारींचे स्वरूप होते. यातील सर्व प्रकरणांत पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेले व त्यासंबंधी योग्य ती कारवाई केली. मात्र उर्वरित प्रकरणांत एकतर नागरिकांनी उत्सुकतेपोटी अॅप्लिकेशनमधील लाल बटण दाबल्याचे लक्षात आले.
काही प्रकरणांत तक्रारदारांनी हे दिल्ली, जम्मू-काश्मीर, केरळ, राजस्थान या ठिकाणांहून संपर्क साधल्याचे आढळून आले.
कार्यक्षेत्राच्या बाहेरचे असले तरी तक्रारदारांची या अॅप्लिकेशद्वारे मदतीची अपेक्षा असल्याने त्यांनी निराश होऊ नये यासाठी अनेक प्रकरणांत पोलिसांनी तक्रारदार ज्या क्षेत्रातला आहे त्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना तक्रारदाराबद्दल माहिती दिली असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले.
१० जणांचे पथक
सध्या दहा जणांचे पथक अॅप्लिकेशनद्वारे आलेल्या तक्रारींच्या निवारणासाठी कार्यरत आहे. मात्र तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेऊन लवकरच यासाठी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातच अद्ययावत कॉल सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अॅपमुळे जखमींचे प्राण वाचले
मीरा रोड येथील स्कायवॉकवरून एक पस्तीस वर्षीय इसम खाली पडून जबर जखमी झाला होता. एका नागरिकाने अॅपद्वारे पोलिसांशी संपर्क साधल्यावर अवघ्या दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमीला रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने जखमी व्यक्तीचे प्राण वाचले.