यंदा करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण आणि उत्सव निर्बंध हटविल्यामु‌ळे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शहरात नागरिकांनी मोठ्याप्रमाणात फटाक्यांच्या आतिषबाजी केली. परंतु या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शहरात ११ ठिकाणी आग लागल्याचे प्रकार समोर आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी नसली तरी अशा घटना नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा- विद्युत दिव्यांच्या रोषणाईने पुन्हा उजळले ठाणे शहर

दिवाळीनिमित्त करण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे ध्वनी तसेच वायू प्रदुषण होते. करोनाकाळात मात्र निर्बंधामुळे दिवाळीचा सण साध्या पद्धतीने साजरा झाला. फटाक्यांच्या धुंराचा आणी आवाजाचा रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून अनेकांनी फटाके फोडणे टाळले होते. यामुळे गेले दोन वर्षे शहरात दिवाळीच्या काळात वायु आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाली नव्हती. यंदा राज्य शासनाने सण आणि उत्सव निर्बंध हटविले असून यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवापाठोपाठ दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. यंदा फटाके फोडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी हे एकाच दिवशी म्हणजेच सोमवारी साजरे झाले. या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली असून या फटाक्यांमुळे शहरात इमारतींमधील सदनिका, रस्त्यालगत असलेला कचरा तसेच झाडांना आग लागण्याचा घटना घडल्या. दिवसभरात ११ घटना घडल्या आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग तात्काळ विझविली असून यामुळे या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हेही वाचा- बापरे ! उल्हासनगरमध्ये माथेफिरूने चक्क इमारतीवर सोडले रॉकेट

आगीच्या घटनांची माहिती

विवियाना मॉल जवळ, स्कायवॉकच्या बाजूला कचऱ्याला आग लागली होती. महात्मा फुले नगर येथील आई माता मंदिर जवळील सचिन तेंडुलकर स्टेडियमच्या बाजुला झाडाला आग लागली होती. खोपट येथे जानकी आनंद सोसायटी जवळील झाडाला आग लागली होती. खारेगाव नाका येथील आनंद विहार कॉम्प्लेक्स, इमारत क्रमांक- १४ मधील सहाव्या मजल्यावर खिडकीजवळील कबुतर जाळीला आग लागली होती. मुल्लाबाग येथील निळकंठ ग्रीन येथे फेमिगो इमारतीच्या २० मजल्यावरील एका रुममधील वॉशिंग मशिनच्या युनिटला आग लागली होती.

हेही वाचा- डोंबिवली : ऐन दिवाळीच्या दिवशी मामाकडून भाच्याचा खून; कुटुंबादेखत चाकुने केले वार

कळवा येथील सायबा हॉल जवळील पत्र्याच्या शेडवरती असलेल्या प्लॅस्टिकला आग लागली होती. कळवा येथील पारसिक नगर भागात झाडाला आग लागली होती. पोखरण रोड येथील कोर्ट-यार्ड सोसायटी जवळ, रोझाना टॉवरच्या बाजूला, इमारतीच्या २८-व्या मजल्यावरील गॅलरीत असेलल्या कचऱ्याला आग लागली होती. कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा भागातील साई नगरी सोसायटीमध्ये झाडाला आग लागली होती. बी-कॅबीन येथील वर्स- स्टाईल फिटनेस व्यायामशाळेमध्ये आग लागली होती. ठाणे स्थानकाजवळील जय हिंद कलेक्शन या दुकानाच्या छतावरती असलेल्या प्लॅस्टिक ताडपत्रीला आग लागली होती.