लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी संध्याकाळी कल्याणमध्ये येणार होते. दुपारपासून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी दुर्गाडी किल्ला भागात पुष्पगुच्छ, फटाके फोडण्यासाठी सज्ज होते. तेवढ्यात भिवंडी कोनकडून पोलीस इशारा देत आवाज करत सुसाट येताना दिसले, राज ठाकरे आले म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताफा जवळ आला तसा फटाक्यांच्या माळा वाजविल्या. राज यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी धावपळ सुरू असतानाच, ताफा सरळ पुढे निघून गेला…मग मनसे कार्यकर्त्यांना समजले ते राज ठाकरे नव्हते तर तो ताफा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांचा होता.

या सगळ्या गोंधळात मनसे कार्यकर्त्यांची मात्र आता नवीन फटाके कोठून आणायचे आणि राज ठाकरे आल्यावर काय करायचे असा गोंधळ उडाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या कल्याण दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ते कल्याण मधील खडकपाडा भागातील स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथेच त्यांचा मुक्काम असणार आहे. शनिवारी सकाळी ते डोंबिवलीत येऊन मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

आणखी वाचा-ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक

आपले नेते कल्याणमध्ये येत आहेत म्हणून मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून दुर्गाडी पूल येथे गर्दी केली होती. त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा ताफा भिवंडीहून कल्याण दिशेने दुर्गाडी पुलाकडे येत होता. कार्यकर्त्यांना दूरवरून कोन दिशेने पोलीस वाहन आणि वाहनांचा ताफा दिसला. राज ठाकरे आले म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ताफा जवळ आला तसा फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली.

ताफा जवळ येऊन पुढे निघून गेला, मग राज ठाकरे आपण उभे असताना स्वागतासाठी थांबले का नाहीत याविषयी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. साहेब थांबले का नाहीत, म्हणून कार्यकर्ते संभ्रमात पडले. अखेर काही वेळाने तो ताफा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या वाहनांचा असल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मात्र कार्यक्र्त्यांमध्ये हशा आणि फटाके फोडणाऱ्यांचा, स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन धावणाऱ्यांचा हिरमोड झाला.

आणखी वाचा-परीक्षांच्या काळात तरी लोकल वेळेत चालवा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती

राज ठाकरे यांचे आगमन

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा ताफा गेल्यानंतर काही वेळाने पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण येथे आगमन झाले. त्यांच्य सोबत मनसेचे आमदार प्रमोद पाटील होते. दुर्गाडी पूल येथे ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आली. शुक्रवारी ते कल्याण मधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे आगमन आणि मार्गदर्शन चर्चेचा विषय झाला आहे.