बदलापूर : इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहे. तर येणारा महिना, दीड महिना हा महत्वाच्या परीक्षांचा आहे. बहुतांश विद्यार्थी दूरवरच्या शाळा, महाविद्यालयात परीक्षांसाठी जात असतात. अशावेळी तरी मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल नियमित वेळा पत्रकानुसार चालवाव्यात, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला केले आहे. लोकल फेर्‍या नियमित नसल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या काळात तरी वेळापत्रक कोलमडणार नाही, याची रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही महिन्यात उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सातत्याने कोलमडते आहे. त्यामुळे चाकरमानी आणि प्रवाशांना लेट मार्कला सामोरे जावे लागते. अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दूरवरच्या शाळा आणि महाविद्यालयात शिकण्यासाठी जातात. त्यांनाही या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका बसतो. उशिराने येणाऱ्या लोकल गाड्यांमुळे शाळा, महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आता मंगळवारपासून उच्च माध्यमिक अर्थात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. इतर परीक्षाही सुरू झालेल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेतच पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे या परीक्षांच्या काळात लोकल सेवा नियमित वेळेत असावी, असा आग्रह विद्यार्थी आणि पालकांचा आहे. या मागणीवरून रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय परिचालन व्यवस्थापक यांना निदान परीक्षांच्या काळात तरी लोकल सेवा नियमित ठेवावी असे आवाहन केले आहे.

हेही वाचा…ठाणे स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, श्रम टाळण्याबरोबच वेळेच्या बचतीसाठी रेल्वे रुळ ओलांडत लोखंडी अडथळ्यांमधून प्रवास

कल्याणपासून पुढे मुंबईत लोकल सेवा विस्कळीत झाली तरी किमान रस्ते मार्गे परीक्षा स्थळ गाठणे शक्य होते. मात्र कल्याण – कर्जत आणि कल्याण – कसारा रेल्वे मार्गांची वाहतुक सुरळीत नसेल तर अन्य कोणतीही खासगी अथवा सार्वजनिक जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे परीक्षांच्या काळात कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल कोणत्याही परिस्थितीत वेळेत चालवा, अशी मागणी महासंघाने रेल्वे प्रशासनाकडे केली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. लोकलआधी मेल एक्स्प्रेस, मालगाडी पुढे काढण्यात येत असल्यामुळे कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल नेहमीच उशिरा धावत असतात. परीक्षांच्या काळात तरी रेल्वे प्रशासनाने असे प्रकार करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway passenger association demands local trains to run on regular schedule during exams citing fear of student s education loss psg