जलप्रदूषणामुळे शेती, गुरांनाही फटका बसण्याची भीती

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यात असलेल्या टाहुलीच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या मुखी गोवरी या नदीच्या पात्रात रविवारी मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच पाहायला मिळाला. नदीकिनारी असलेल्या एका कंपनीतून रसायने सोडल्याने या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नदीत अशाच प्रकारे रसायने मिसळल्यास त्याचा फटका पाण्यावर अवलंबून असलेल्या गुरांना आणि शेतीलाही बसण्याची भीती व्यक्त होते आहे. या प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून नमुने घेतले आहेत. आता ग्रामीण भागांतही प्रदूषणात वाढ होत असल्याने पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

अंबरनाथ तालुक्यात औद्येगिक वसाहतीच्या शेजारच्या नैसर्गिक जलप्रवाहांना यापूर्वीच प्रदूषणाचा फटका बसला आहे. वालधुनी नदीच्या प्रदूषणाचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. या प्रदूषणाचा ठपका शेजारील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांवर ठेवला जातो. मात्र आता थेट ग्रामीण भागातील नद्या आणि ओढ्यांमध्येही रसायने मिसळली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरातून काही नद्या उगम पावतात. त्यात स्थानिकांमध्ये परिचित असलेली मुखी गोवरी नदी मलंगगड पट्ट्यातून प्रवास करत पुढे कासाडी नावे वाहते. नदीच्या १५ ते १७ किलोमीटरच्या प्रवासात आसपासची १० गावे या नदीच्या पाण्याचा वापर करतात. शेती, गुरे यांच्यासाठी ही नदी महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नदीच्या पात्रातही रसायने सोडली जात असल्याचे दिसून आले आहे. रविवारी नदीच्या पाण्यावर शेकडो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसले.

या नदीकिनारी असलेल्या एका कंपनीतून या पात्रात रसायने सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. या प्रकारानंतर संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. मुखी गोवरी नदीच्या पाण्याचा वापर शेती आणि गुरांसाठी केला जातो. मात्र अशा प्रकारे रसायने मिसळली जात असल्यास नदीच्या पाण्याचा आणि शेती, गुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. त्यामुळे गुरांचा जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर अंबरनाथ तालुका महसूल विभागाच्या वतीनेही या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला.