घोलाईनगरातील रहिवाशांचा प्रवास सुरक्षित होणार 

कळवा येथील घोलाईनगर भागातील रेल्वे रुळावर पादचारी पूल उभारणीचे काम अखेर सुरू झाले आहे. डिसेंबरअखेपर्यंत पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाअभावी घोलाईनगर आणि इंदिरानगर भागातील रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागत होता. मात्र, या पुलामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच इथे होणारे अपघातही टळणार आहेत.

कळवा येथील डोंगराळ भागात घोलाईनगर आणि इंदिरानगर परिसर आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्येची ही वस्ती आहे. येथील नागरिकांना ये-जा करताना जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागत होता. त्यांच्यासाठी पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू असून ते डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

घोलाईनगर आणि इंदिरा नगर भागात प्राथमिक सुविधांचा मात्र अभाव आहे. इथे शाळा तसेच रुग्णालयही नाही. या सुविधांसाठी रहिवाशांना थेट पारसिकनगर गाठावे लागते. येथील शेकडो मुलेही पारसिकनगरमधील शाळांमध्ये जातात. त्या मुलांनाही दररोज रेल्वे मार्ग ओलांडून शाळा गाठावी लागते. या ठिकाणी एक धोकादायक वळण असल्याने कल्याणहून ठाण्याकडे जाणाऱ्या गाडय़ा चटकन दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना इथे आपला जीव गमवावा लागला आहे. इथे पादचारी पूल मंजूर झाला असला तरी बराच काळ तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. ‘लोकसत्ता ठाणे’ने या समस्येचा पाठपुरावा केला. अखेर या गंभीर समस्येची दखल घेऊन रेल्वेने काम सुरू केले असून डिसेंबरअखेपर्यंत ते पूर्ण होईल, अशी आशा आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच याविषयी विश्वास व्यक्त केला आहे.