प्रतिभावंत बदलापूरकरच्या कार्यक्रमात उदय कोतवाल यांची खंत; नागरिकांना कोश न काढण्याचे आवाहन
वाढती जंगलतोड यामुळे फुलपाखरांचे नैसर्गिक अधिवास कमी होत असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची खंत फुलपाखरांचे अभ्यासक उदय कोतवाल यांनी व्यक्त केली. ते प्रतिभावंत बदलापूरकर या कार्यक्रमादरम्यान फुलपाखरांवर सचित्र व्याख्यान देताना बोलत होते. शहरातील प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी दरमहा एकदा होणाऱ्या या कार्यक्रमाचे दहावे पुष्प बदलापूरकर रसिकांनी अनुभवले. रविवारी सायंकाळी काका गोळे फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने रसिक उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविक आणि आभार वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी केले.
जैविक साखळीतील फुलपाखरू हा एक महत्त्वाचा घटक असून फुलपाखरू टिकणे अत्यंत आवश्यक आहे. वनसंपदेचा ऱ्हास या कोवळ्या जीवांचा घात करत असल्याचेही ते म्हणाले. या वेळी घरातील कुंडीत अथवा परिसरातील झाडांवर दिसणारी अळी अथवा पांढरे कोश हे लोकांनी काढू नये, ती फुलपाखरांची अंडी असण्याची दाट शक्यता असते. त्याच्याने झाडाला कोणताही अपाय होत नाही, त्यामुळे असे कोश काढू नयेत, असे आवाहन त्यांनी या वेळी नागरिकांना केले. तसेच फुलपाखराच्या जन्माच्या चार अवस्था असतात, मात्र कोणत्याही एका अवस्थेत असताना नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसल्यास ती अवस्था बराच काळ टिकू शकते, ही त्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे.
बदलापुरातील फुलपाखरांबाबत ते म्हणाले की, करंगळीच्या नखाच्या आकाराएवढय़ा फुलपाखरापासून ते ब्लू मैबाथ यामधील सर्व प्रजाती परिसरात आढळतात. फुलपाखरांचा जीवनक्रम , त्यांच्या रंगसंगतींमधील वैशिष्टय़े त्यांचे स्थलांतर याविषयी सोप्या शैलीत कोतवाल उपस्थितांना माहिती दिली.

प्रवासाचे रहस्य
फुलपाखराचे आयुष्य हे आठ आठवडय़ांचे असते. मात्र अनेक फुलपाखरे ही भारतातून समुद्र ओलांडून श्रीलंकेत जाऊन आपली अंडी घालतात. तेथेच या फुलपाखरांचा कार्यकाळ संपतो. मात्र तेथे जन्माला आलेली नवी फुलपाखरे बरोबर भारतातून आधी निघालेल्या फुलपाखरांच्या अधिवासात येतात.