प्राणवायूच्या तुटवडय़ामुळे बळी गेल्याची चर्चा; रुग्णालयाचा नकार

ठाणे : प्राणवायूच्या कमतरतेमुळे दिल्लीतील एक रुग्णालयात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात प्राणवायूच्या अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने ठाणे शहर हादरले. रुग्णालयातील प्राणवायू पुरवठा सुरळीत असून या चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू आल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने स्पष्ट केले असले तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेण्यात आली आहे. दरम्यान, चार रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

वेदांत रुग्णालयात सध्या प्राणवायूची गरज असलेले ५४ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी सुमारे ३५ रुग्ण अत्यवस्थ आहेत. या रुग्णालयातील प्राणवायू साठा संपला आणि त्यामुळे सहा रुग्ण दगावले, असे वृत्त सोमवारी सकाळी समाजमाध्यमांवरून पसरले. त्यामुळे खळबळ उडाली. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. पाठोपाठ प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि बघ्यांचीही गर्दी जमल्याने. रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला.  या गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू शकतो, याचा अंदाज घेत ठाणे पोलिसांनी रुग्णालय परिसरात सुरक्षा कवच उभारले व बघ्यांना हुसकावून लावले. रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले. ‘रुग्णालयाचा प्राणवायूपुरवठा सुरळीतपणे सुरू असून सहा नव्हे तर चारच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांचा कशामुळे मृत्यू झाला, याची चौकशी सुरू आहे,’ असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे परिस्थिती काहीशी निवळली. अर्थात मृत्यू झालेल्या चार रुग्णांच्या नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून सोडत होता. काहींनी रुग्णालयाच्या कारभारावर आरोप केले.

दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह दुपारी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री िशदे यांनी दिले. या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णालयात झालेल्या मृत्यूची चौकशी डॉ.आशिया यांच्या मार्फत सुरू होती. या चौकशी समितीत महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी वैजयंती देवगेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार आणि इतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान ‘प्राणवायू साठा कमी असता तर मृत्युसंख्या जास्त असती. तरीही चौकशी समिती अंतिम निष्कर्ष काढेल, त्याच्यानुसार शासन पुढील कार्यवाही करेल,’ असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

 

गेल्या १२ तासामध्ये चार रुग्णांचे टप्प्याटप्प्याने मृत्यू झाले आहेत. पण, प्राणवायू अभावी हे मृत्यू झालेले नाहीत. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा साठा उपलब्ध आहे. तसेच प्राणवायूचा तुटवडा जाणवला तर आमची तीन रुग्णालये आहेत, त्यांच्याकडून आम्ही तो उपलब्ध करून घेत असतो. तसेच महापालिकेकडूनही आम्हाला सकाळी प्राणवायू पुरवठा उपलब्ध झालेला होता. समितीपुढे आम्ही याबाबतचे पुरावे सादर करणार आहोत.

डॉ. अजय सिंग, रुग्णालय प्रमुख, वेदांत रुग्णालय