scorecardresearch

ठाकुर्ली खंबाळपाडा येथे परीक्षार्थीसाठी मोफत रिक्षा प्रवास

परीक्षा काळात विद्यार्थी, पालक तणावामध्ये असतात. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत रिक्षेने जाऊ शकत नाहीत.

SSC HSC board exam

डोंबिवली : दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या ठाकुर्लीजवळील खंबाळपाडा, भोईरवाडी भागातील विद्यार्थ्यांची घरापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत जाताना आबळ होऊ नये म्हणून डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा संघटनेने खंबाळपाडा, भोईरवाडी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत मोफत रिक्षा प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा काळात विद्यार्थी, पालक तणावामध्ये असतात. काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत रिक्षेने जाऊ शकत नाहीत. परीक्षा काळातील ही तणावाची परिस्थिती विचारात घेऊन डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी आपल्या रिक्षा संघटनेच्या सर्व सदस्यांना परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना भाडे नाकारू नका. विद्यार्थी, पालकांजवळ भाडय़ासाठी पैसे नसतील, पण त्यांची रिक्षेने परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थी, पालकांना रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षेत घ्यावे. पालक, विद्यार्थ्यांचा मोबाइल क्रमांक, पत्ता मागवून घ्यावा. त्या विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रापर्यंत मोफत सोडावे. त्याच्याकडून भाडे आकारू नये. हे भाडय़ाचे पैसे रिक्षा चालकाला लाल बावटा रिक्षा संघटना कार्यालयातून त्याने विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रापर्यंत नि:शुल्क सोडल्याचा सबळ पुरावा दाखविल्यावर दिले जातील, असे अध्यक्ष कोमास्कर यांनी सांगितले.

खंबाळपाडा, भोईरवाडी भागातून देविदास सोनकांबळे हे रिक्षा चालक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्याचे काम परीक्षा संपेपर्यंत करणार आहेत. त्यांचा मोबाइल क्रमांक ८६९३०१८४०६ आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Free rickshaw auto ride for examinees at thakurli khambalpada akp

ताज्या बातम्या